You are currently viewing दगड
Oplus_16908288

दगड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*दगड*

 

नुसता दगड आहे , काही समजत नाही याला हे शेजारच्या घरातून रागाने म्हटलेले शब्द कानावर आले. आणि मनात विचार चक्र सुरू झाले, दगड म्हणजे ज्याला काही समजत नाहीं बुद्धी कमी आहे,अशी व्यक्ती असा सरळ सोपा अर्थ! पण जसजसा विचार करू लागले दगडाचे अनेक अर्थ,उपयोग ,प्रकार समोर येऊ लागले. एखाद्याला दगड म्हणणे किती चुक आहे असं वाटूलागले,,पूर्वीच्या काळी जेंव्हा आधुनिक यंत्रांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला नव्हता, तेंव्हा ह्याच दगडांनी घरातल्या बाईला सुगरण हा शेरा मिळवून दिला होता, पाट्यावर चटणी ते पुरण सगळं वाटून होत होतं जात्यावर बेसन हळद तिखट मीठ आणि साखरही बारीक केल्या जात होती।

हाच तो दगड, जो आपल्या चवीचे पदार्थ बनवितांना कामी येत होता, आठवत ना? आजही स्वयंपाकघरात पुष्कळ ओट्यावर एखादा दगड असतोच, आलं लसूण मिरच्या ठेचायला, जुनी आठवण म्हणून! नदीवर कपडे धुतांना प्रत्येकीचा एक दगड ठरलेला असे.तसेच

,धुळीत खेळून पायांना भेगा गेल्या की पाय घासण्यासाठी ह्याच दगडाचा उपयोग केला जात असे. आमच्या खेड्यातल्या वैदर्भीय भाषेत त्याला वजरी म्हणत, कधी एखादे वेळी आजी प्रेमाने दगडाने पाठही घासून देत असेआपल्या नातवंडांची !आम्ही लहानपणी महाशिवरात्रीला सालबर्डीला जायचो तेंव्हा बऱ्याच स्त्रिया, माझी आईसुद्धा तिथले काही विशिष्ट दगड उचलून आणायची.कशासाठी ?तर त्या दगडांनी लोखंडी तवा कढई खूप स्वच्छ साफ होतो म्हणून. तेंव्हा आम्हाला मजा वाटायची की निघाल्या देवदर्शनाला आणि चित्त पहाल तर दगडात!

एक दगड भांडी स्वच्छ करणारा, तर एक दगड पंढरपूर ला विठोबाच्या दाराशी पायरी बनून! आणि एक दगड मंदिरात देव स्वरूपात तर एका दगडाचा उपयोग टोलेजंग इमारत बांधताना पाया मजबूत, पक्का होण्यासाठी होतो, एखादा कारागीर दगडातून अनेक कलाकृती तयार करतो अजिंठा वेरूळची लेणी आपल्याला माहीत आहेतच. दगडाचे प्रकारही खूप आहेत, जीवसृष्टीची निर्मिती होतांनाही एक अवस्था निर्जीव दगडाची आहे कालांतराने तिच्यात चैतन्य येते असं वाचलं आहे, आकाशाकडे झेपावणारे

मोठमोठे डोंगर पाहून मन चकित होतं आपलं.अजस्त्र वेगवेगळी रूपे दिसतात काही दगडात , तर सतत पाण्यात राहून काही नर्मदेचे गोटे गुळगुळीत चोपडे झालेले असतात नर्मदेतील प्रत्येक दगडाला शिव स्वरूप मानले जाते, तर एखाद्याला नुसता नर्मदेचा गोटा अशीही उपमा दिली जाते कोकणस्थांच्या घरी जलाशयाजवळील सात खडे आणून त्यांना महालक्ष्मी स्वरूप मानून त्यांची सांग्रसंगीत पूजा केली जाते पुरणावरणाचा नैवेद्य दाखविला जातो.अगदी लहानसा दगड, ज्याला खडा म्हणतात त्याचाही उपयोग करून आम्ही लहानपणी खूप खेळलो आहे सात खड्यांचा, नऊ खड्यांचा डाव ! काही खोडकर मुले गोफणीत खडे ठेवून निशाणेबाजी करित.विचार केला तर मनुष्याचे संपूर्ण जीवनच ह्या खड्यांनी व्यापून टाकलं आहे नाही का? अगदी शेवटीसुद्धा खडा असतो बरोबर! एखादे मोठे दुःख पचवितांना काळजावर दगड ठेवून ते पचवले असं म्हटल्या जाते, सगळ्या भावना बोथट झाल्या, थिजून गेले मी क्षणभर दगड झाले अशी वाक्ये आपल्याला नवीन नाहीत शेतकरी कामकरी दगडाची उशी व आभाळाचे पांघरूण घेतो असे म्हणतात असा हा वेगवेगळी रूपे घेऊन आपल्या जीवनाशी समरस झालेला बहुगुणी बहुरंगी बहुरूपी बहुउपयोगी

दगड! विविध स्वरूपात सतत आपल्या सोबत असणारा! आणि तरी आपण एखाद्याला नुसता दगड आहेस तू !असे म्हणत असतो , काळीज आहे की दगड हे वाक्यही आपल्याला नवीन नाही,अशी ही दगडाची दगड कथा!

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा