You are currently viewing एक जागतिक संकल्प दहा वर्ष जगाची पदयात्रा २५ देशातून जाणार

एक जागतिक संकल्प दहा वर्ष जगाची पदयात्रा २५ देशातून जाणार

दिल्ली :

या जगाला शांततेचा जागतिक संदेश देणारी ऐतिहासिक बैठक नुकतीच भारताचे शाही इमाम व जैन मुनींची सौहार्दपूर्ण संवाद सभा ही दिल्ली येथे संपन्न झाली आहे. जैन मुनींनी २५ देशाचा २५ हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचे ठरविले असून त्यासाठी १० वर्षांचा अहिंसेचा पदयात्रेचा संकल्प केला आहे. हा मानवतेचा जागतिक संकल्प आहे असे म्हणावयास हरकत नाही.

आजचे जग अनेक प्रकारच्या व्याधींनी भरलेले आहे. कुठे युद्धाची धग आहे, कुठे दहशतीची सावली, कुठे धार्मिक द्वेष तर कुठे असहिष्णुतेची खोल दरी. अशा काळात, जेव्हा मानवता स्वतःलाच प्रश्न विचारत आहे .आपण कुठे चाललो आहोत? त्याच काळात भारतभूमीवरून शांततेचा, बंधुत्वाचा आणि अहिंसेचा संदेश घेऊन निघणाऱ्या दोन जैन मुनींची ही पदयात्रा ही केवळ एक धार्मिक उपक्रम नसून ती संपूर्ण मानवजातीसाठी आशेचा किरण ठरणार आहे यात शंकाच नाही.

याच ऐतिहासिक आणि मानवतावादी उद्देशाने दिल्ली येथे भारताचे शाही इमामसाहेब आणि जैन मुनी मा. डॉ. अभिजीतकुमार व जैन मुनी या. जागृतकुमार यांच्यात एक अत्यंत सौहार्दपूर्ण, भावनिक व आध्यात्मिक बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीचे आयोजन व घडवून आणण्यामध्ये मिशन आय ए एस चे कार्याध्यक्ष श्री. महेबूब कासार (निवृत्त राज्यकर उपायुक्त) मुंबई यांनी मोलाची व निर्णायक भूमिका पार पाडली आहे

जैन मुनींनी २५ देशाचा २५ हजार किलोमीटरचा १० वर्षांचा शांततेचा प्रवास करण्याचा संकल्प केला आहे.

जैन मुनी मा.डॉ.अभिजीत कुमार व जैन मुनी जागृतकुमार हे लगेच येत्या काही दिवसांमध्ये एक अभूतपूर्व जागतिक पदयात्रा सुरू करणार आहेत.

ही पदयात्रा पुढील दहा वर्षांमध्ये पूर्ण होणार असून, त्यामध्ये ते २५ देशांमधून सुमारे २५ हजार किलोमीटर पायी प्रवास करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम ठरणार आहे.

या पदयात्रेचा उद्देश केवळ प्रवास नाही, तर अहिंसेचा जागतिक संदेश देणे शांतता आणि बंधुत्वाची भावना जागविणे मानवतेचा, करुणेचा आणि प्रेमाचा दीप प्रत्येक देशात पेटविणे धर्म, जाती, भाषा आणि राष्ट्रांच्या पलीकडे जाऊन “माणूस” म्हणून एकत्र येण्याचा संदेश देणे हा आहे.

ही पदयात्रा सध्या नियोजनाच्या अंतिम टप्प्यात असून या पदयात्रेच्या यशस्वितेसाठी जगातील विविध देशांतील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला जात आहे.

याच संदर्भात शाही इमाम व जैन मुनींची धर्मांपलीकडील मानवतेची हाक हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून दिल्ली येथे संपन्न झालेली ही बैठक अत्यंत खेळमेळीच्या, आपुलकीच्या आणि चिंतनशील वातावरणात पार पडली.

शाही इमाम यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे जैन मुनींना विविध देशांमधील संभाव्य अडचणी, सांस्कृतिक संवेदनशीलता, धार्मिक आचार-विचार आणि सामाजिक वास्तव याबाबत अत्यंत मौल्यवान मार्गदर्शन केले.

विशेषतः कोणत्या देशांमध्ये धार्मिक ओळखीबाबत संवेदनशीलता अधिक आहे तेथे वावरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी स्थानिक लोकांशी संवाद कसा साधावा अहिंसेचा संदेश कसा प्रभावीपणे मांडावा याबाबत शाही इमाम यांनी उपस्थितांना सखोल माहिती दिली.

या मार्गदर्शनाचे जैन मुनींनी मनापासून स्वागत केले असून आणि या भेटीला आपल्या आयुष्यातील एक अमूल्य क्षण असल्याचे सांगितले आहे .“मार्ग वेगळे असू शकतात, पण ध्येय एकच आहे” असे उद्गार याप्रसंगी म्हणजे या भेटीदरम्यान शाही इमाम यांनी अत्यंत मार्मिक आणि अंतःकरणाला भिडणारे शब्द उच्चारले. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते म्हणाले “भले जीवन जगण्याचे मार्ग वेगवेगळे असतील, जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, धर्म, भाषा, संस्कृती वेगळी असेल पण अंतिम लक्ष्य एकच आहे…शांतता, बंधुता, प्रेम, मानवता आणि एकात्मता.”

हे शब्द केवळ भाषण नव्हते, तर ते आजच्या जगासाठी एक विकासाचे मार्गदर्शक तत्व होते. आजच्या अस्वस्थ जगासाठी आशेचा संदेश देणारी ही बैठक संपूर्ण जगाला दिशा देणारी ठरली आहे. आज संपूर्ण जग अस्वस्थ आहे. कुठे युद्ध, कुठे हिंसा, कुठे धार्मिक द्वेष, कुठे भय आणि कुठे अस्थिरतेचे वातावरण.

अशा परिस्थितीत भारतीय जैन मुनींनी पायी प्रवास करून शांततेचा संदेश देण्याचा घेतलेला संकल्प हा खरोखरच भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी गौरवाची बाब आहे. ही पदयात्रा केवळ शब्दांची नाही, तर ती प्रत्यक्ष कृतीतून दिलेला संदेश आहे

“हिंसेला उत्तर अहिंसेने, द्वेषाला उत्तर प्रेमाने आणि अज्ञानाला उत्तर करुणेने. हा संकल्प या बैठकीतून व्यक्त झाला आहे. मुंबई येथे असलेले मिशन आयएएसचे कार्याध्यक्ष श्री. महेबूब कासार यांची मोलाची भूमिका ही बैठक आयोजित करण्यामध्ये ठरली आहे.

या ऐतिहासिक जागतिक भेटीच्या घडामोडींमध्ये मिशन आय ए एसचे कार्याध्यक्ष श्री. महेबूब कासार (निवृत्त राज्यकर उपायुक्त), मुंबई यांनी निभावलेली भूमिका विशेष उल्लेखनीय ठरलेली आहे.

विविध धर्मीय विचारधारांना एकत्र आणून संवाद घडवून आणणे, हे आजच्या काळात सोपे नाही; परंतु श्री कासार यांनी ही जबाबदारी अत्यंत संवेदनशीलतेने आणि यशस्वीपणे पार पाडली आहे.

त्यांच्या प्रयत्नांमुळे व पुढाकारामुळे दोन महान धार्मिक परंपरांमध्ये संवाद साधला गेला असून जागतिक शांततेसाठी एक मजबूत पाया घातला गेला आहे. मानवतेचा संदेश अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याची दिशा मिळाली आहे.

भारताचा आध्यात्मिक संदेश जगापर्यंत पोहोचविण्यासाठी केलेला हा एक अतिशय चांगला प्रयत्न आहे. ही बैठक केवळ दिल्लीपुरती मर्यादित नव्हती. तर ही बैठक म्हणजे भारताच्या आत्म्याचा आवाज होता.

जो सांगतो की, भारत हा केवळ भौगोलिक देश नाही, तर तो शांततेचा, सहिष्णुतेचा आणि आध्यात्मिकतेचा विचार आहे. जैन मुनींची भविष्यात होणारी ही पदयात्रा आणि शाही इमाम यांचे मार्गदर्शन हे एकत्र येऊन या जगाला सांगत आहे की “मानवता हाच खरा धर्म आहे.”

दिल्ली येथे संपन्न झालेली ही भेट निश्चितच इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी ठरली आहे. ज्या काळात जग विभाजनाच्या कड्यावर उभे आहे, त्या काळात ही बैठक संवाद, सौहार्द आणि सहअस्तित्वाचा दीप पेटविणारी ठरली आहे.

जैन मुनी मा.डॉ. अभिजीत कुमार व जागृत कुमार यांची पदयात्रा ही केवळ चालण्याची पदयात्रा नसून तर तो जगाला जोडणारा तो एक आध्यात्मिक सेतू ठरणार आहे.

आणि या सेतूच्या निर्मितीत शाही इमाम यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन ही एक अमूल्य देणगी ठरली आहे असेच म्हणावे लागेल. जैन मुनींनी घेतलेल्या या अभूतपूर्व जागतिक शांततेच्या निर्णयाला मनापासून शुभेच्छा…!

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा