You are currently viewing घोटगेत हत्तींचा धुमाकूळ; मुलाने वाचवला वृद्ध वडिलांचा जीव

घोटगेत हत्तींचा धुमाकूळ; मुलाने वाचवला वृद्ध वडिलांचा जीव

घोटगेत हत्तींचा धुमाकूळ; मुलाने वाचवला वृद्ध वडिलांचा जीव

दोडामार्ग

तालुक्यातील घोटगे गावात काजू बागेत काम सुरू असताना सहा हत्तींचा कळप अचानक समोर आल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. या थरारक प्रसंगात ८० वर्षीय आत्माराम दळवी हे हत्तीच्या अगदी जवळ गेले होते; मात्र त्यांचा मुलगा भरत दळवी यांनी प्रसंगावधान राखत वडिलांना उचलून सुरक्षित स्थळी नेले आणि अनर्थ टळला.
घटनेनंतर बागेत काम करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गोंधळात दोन महिला शेतकरी खाली पडून जखमी झाल्या. संतप्त हत्तीने काजूची अनेक झाडे मोडीत काढत बागेचे मोठे नुकसान केले. नुकसानीचा पंचनामा अद्याप झालेला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून परिसरात हत्तींचा वावर वाढला असून शेतकरी सतत दहशतीखाली काम करत आहेत. याबाबत वनविभागाला वारंवार कळवूनही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही, असा आरोप भरत दळवी यांनी केला आहे.
वनविभागाच्या निष्क्रियतेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने उपाययोजना करून हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे घोटगे परिसरात भीतीचे सावट कायम आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा