*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी मुबारक उमराणी यांनी “आयुष्याचे पुस्तक माझे” काव्यसंग्रहाचे केलेलं परीक्षण*
*आयुष्याचे पुस्तक माझे*
✒️कवी : श्री प्रकाश वायदंडे, सांगली
धरतीच्या या पृष्ठावरती,
जीव साखळी जपा..
जगा आणि जगू द्या,
ह्या मंत्राकरीता खपा
अशा इराद्याने प्रकाश वायदंडे यांची कविता प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड या भावनांनी मानवतेसाठी प्रकाशशलाका बनून आपले आगळे वेगळे अस्तित्व दर्शवते. साहित्याच्या प्रांगणात त्यांची कविता नव्या उमेदीने दीपस्तंभाप्रमाणे जीवनाचा मार्ग दाखवत राहते.त्यांच्या कवितेतील आर्तता मानवी दुःख मांडत राहते.त्यांच्या सर्व कविता भावनाप्रधान आणि आशयघन असून त्यात विषयवैविध्य आहे असे दिसते.
“आयुष्याचे पुस्तक माझ्या ” या काव्यसंग्रहातील कवितांच्या रचनावरून असे दिसते की, कवी गाव आणि नगरांचा चेहरा वाचतांना थकत नाही. निसर्गातील झाडे तुटत असतांना त्याच्या मनाची अस्वस्थता वाढते तरीही नाउमेद न होता चालत राहतो. त्यावेळी अंतरीचा आवाज कवीशी संवाद करु लागतो. त्याच्या अस्वस्थतेच्या वळणावर डोळ्यात अश्रू तरळतात. त्या अश्रूजलाने त्याच्या आयुष्याची वाट ओली होत जाते. पण मनातील आकांक्षाची नौका नात्यांची वीण जपत पुढे चालत राहते. वसुंधरेच्या आक्रोशातून जीवनसागरात त्सुनामीचे तांडव निर्माण होते. तेव्हा न डगमगता जगण्याची वाट धुंडाळतो. तेव्हा पुस्तकेच त्याला दिशा दाखवतात. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे शब्दच जगण्याचे मंत्र होतात. पुस्तकांच्या वाचनातून जगण्याची प्रेरणा मिळते. ” वाच पोरा वाच थोडे”या कवितेतून वाचकांना जगण्याची आणि वाचण्याची ऊर्जा घेण्याचे आवाहन करतात. ज्ञानार्जनातूनच जीवनाचा मार्ग सुकर होतो हे स्पष्ट करतात.या मार्गावरून जातांना सत्य, अहिंसा आणि शांतीचा तथागत बुद्धाने सांगितलेला मार्ग गवसतो. त्यांच्या सर्वच कविता याच मार्गावरून जातात.आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करताना कवीला सुख-शांतीने जगण्याचा मार्ग गवसत जातो.
कवी आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून वाचकांच्या मनात जगण्याची उमेद निर्माण करतो. त्याची कविता अनुभूती, स्वानंद, रंजन आणि प्रबोधन या मार्गाने संकटाशी लढण्याची शक्ती देते. त्यातून आयुष्याचे भले होत जाते.जीवनात आपण संयमानेच सर्व काही मिळवू शकतो. कवी आपल्या प्रतिभेविषयी म्हणतात, (पा.क्र.२१)
प्रतिभेचे बळ मला
रोज आवाज देते.
त्यातून एक नवी कविता
जन्मालाही येते.
प्रकाश वायदंडे यांच्या कवितासंग्रहाचे निरीक्षण केल्यास त्यामध्ये प्रबोधन, पर्यावरणशिक्षण, निसर्गरक्षण, पुस्तक, दुष्काळ, नदी, बालशिक्षण आणि विकास, जगण्याचे तत्त्वज्ञान, काव्यभक्ती,शेती माती आणि पाणी, अशा अनेक विषयासंबंधी आपले विचार काव्यातून उत्तम प्रकारे मांडलेले आहेत. त्यांच्या कवितातून शेतकरी जीवनाविषयी कळवळा आणि सामाजिक भान व्यक्त झालेले दिसते. या काव्यसंग्रहात निसर्ग कविता, प्रेम कविता, देशभक्तीपर कविता आणि सामाजिक कविता अशा अनेक प्रकारच्या कविता समाविष्ट आहेत. या कवितांमध्ये कवीने साध्या सोप्या भाषेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या कविता कुटुंब, समाज व राष्ट्र अशा घटकांशी नाळ जोडणाऱ्या असून त्या इथल्या मातीशी, माणसांशी आणि निसर्गाशी इमान राखणाऱ्या आहेत.
कवितासंग्रह वाचल्यावर कवीच्या मनावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव जास्त आहे असे वाटते. ते आपल्या काव्यातून महामानवांचा वैचारिक वसा व वारसा जपण्याचा प्रयत्न करतात असे वाटते. त्यादृष्टीने प्रकाश वायदंडे यांच्या कविता त्या विचारांशी इमान राखणाऱ्या कविता आहेत.
कवी स्वतः शिक्षक असल्याने आणि इको क्लबच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा अनुभव व प्रभाव कवितेतून जाणवतो.म्हणूनच समाजशिक्षणाचे उत्तम कार्य करणा-या कविता या संग्रहात पानोपानी भेटतात शिवाय विषय मांडणीत त्यांचा अनुभव कोठेच कमी पडत नाही.शब्द संग्रह भरपूर असल्याने शब्दांची पुनरावृत्ती कोठेच आढळत नाही.शिवाय कवितेचा शेवट हा सकारात्मक असल्याने समाज मनाचे सहज प्रबोधन करतात.म्हणूनच ते आपल्या आयुष्याच्या वाटेवरती (पा.क्र.३३) वर लिहितात,
बिकट वाट चालतांना
हरवू नकोस कधीच तोल
नाहीतर या आयुष्यात
होईल काही भलताच झोल.
असा निर्वाणीचा सल्ला देतात. संवेदनक्षम अनुभव आणि आशयाचा ताजेपणा या वैशिष्ट्यांवर प्रकाश वायदंडे यांचा काव्यसंग्रह निश्चित लक्षणीय ठरणारा आहे.कवीचे जगणे , कवितेची जाण आणि जाणिव त्याचे एक विशिष्ठ मूल्य निर्धारीत करते. मनातला तरल भाव तो आत्मविश्वासाने जागवतो. साधा असणारा मनातला विचार नेमक्या शब्दात मांडल्यामुळे कवितेचा उद्देश स्पष्टपणे उजागर होतो. आजच्या व्यवस्थेविषयी कवी प्रखरतेने आसूड ओढत मनातील व्यथा निर्भयतेने मांडून त्यातून समाजहिताचा विचार कवी करतो. मनात उमेद असेल तर काळ्याकट्ट पाषाणाला पाझर फोडून नवचैतन्य निर्माण करण्याची कवी आपल्या मनात जिद्द ठेवतो. राखेतून उंच भरारी मारणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तो खचलेल्या व्यक्तींच्या हृदयात उमेद रुजवतोय. हे करतांना कवी आपल्या व्यथा जनमाणसात सांगत नाही.पाटी पुस्तक यांच्याशी गट्टी करुन ज्ञानकण वेचावेत. प्रत्येकाने आपल्या चिंतनशीलतेला पुस्तकांची जोड दिली तरच आपली उन्नती आहे. काळावरती स्वार होऊन आपण घोडदौड केली पाहिजे. ज्ञानदीप तेवत ठेवण्यातच खरा पुरूषार्थ आहे म्हणूनच प्रकाश वायदंडे आपल्या कवितेविषयी (पा.क्र.३९) म्हणतात की-
माझी गीते तुझ्यापाशी,
आश्रयाला येतील.
माझ्यानंतर तुला माझे
स्मरण करुन देतील.
त्याचे कारण कविता कवीला आधार देत, सावरत, कवितेचे बीज पेरत, फुलपाखरासारखी भिरभिरत, रिझवत, प्रबोधन करीत, कविमनाला जोजवत असते. त्याच्या मनात अंतस्फूर्त भावना निर्माण करते. याचमुळे कवी म्हणतो,(पा.क्र.५७)
भीम आमुची अस्मिता अन् भीम
पाठीराखा,
महाडच्या चवदार तळ्याचे चला रे
पाणी चाखा,
भीमशक्ती एक होता जीव शिवाला भेटे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच कवीची प्रेरकशक्ती आहेत. दास्यत्वाचे जोखड फेकण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारांमुळे मिळाले. क्रांती ऊर्जेचे पिंपळपान मनात चैतन्याने सळसळते. म्हणूनच आज आम्ही ताठ मनाने उभे आहोत आणि त्यांचा वसा चालवत आहोत असे आवर्जून सांगतो. त्यांच्या सर्व कविता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राहतात. ते वाचकांपुढे समाजनियम, निसर्गनियमासह जीवन जगतानाचा मार्गदर्शक आलेख मांडतात.
या काव्यसंग्रहातील अंतरीचा आवाज, संवाद, अंतरीची कविता, आयुष्याचा ताळेबंद, अस्वस्थतेच्या वळणावर, ओळखलंत का सर, आयुष्याच्या वाटेवरती, अंतरीचा नाद माझ्या, आमुचा भीम, मी पुस्तक आहे, वाच पोरा वाच, बळीराजाची व्यथा अशा अनेक कविता पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह निर्माण करणाऱ्या आहेत. कवीच्या विविध विषयांवरील कविता भावनाप्रधान,आशयसंपन्न, मूल्ये रुजवणा-या आणि समाजमनाचा वेध व ठाव घेणाऱ्या आहेत. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ श्री. राजा ठोके यांनी अतिशय उत्कृष्टपणे साकारले आहे. ते या कविता संग्रहासाठी न्याय देणारे आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्री. विजय चोरमारे यांनी पाठराखण (ब्लर्ब) करणारे लेखन केले आहे. हा कवितासंग्रह वाचकमित्रांना आणि विद्यार्थ्यांना अर्पण केला आहे.न्यू अथर्व पब्लिकेशन, इंचलकरंजी (मो.8805112794) येथून प्रकाशित करण्यात आला आहे. वाचक या संग्रहाचे स्वागत करतील. कवीच्या या वैशिष्ट्ययुक्त रचनाबंध आविष्काराला माझ्याकडून मंगलकामना !
कविता संग्रह :
आयुष्याचे पुस्तक माझ्या
कवी : श्री प्रकाश वायदंडे
मो.नं. 9834353267
प्रकाशक: न्यू अथर्व पब्लिकेशन, इंचलकरंजी.
स्वागत मूल्य : २००/- मुखपृष्ठ : श्री राजा ठोके, विटा. *आस्वादक परीक्षण-
मुबारक उमराणी, सांगली.
मो.नं. ९७६६०८१०९७
