You are currently viewing वादळ

वादळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*वादळ*

 

शाईची बाटली सांडल्यासारखं लखलखीत विजांच्या प्रकाशात आभाळ काळंनिळभोर दिसत होतं… बंद दारावर वादळ त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं व त्याचबरोबर खिडकीच्या फटीतून आत शिरण्याचा प्रयत्न ही करत होतं.

मी सगळी बंद असलेली कवाडं उघडली आणि वादळाशी संवाद साधण्याचा मार्ग खुला केला…. संवादातून कुठलंही, कितीही मोठं वादळ शांत होतं असं म्हणतात पण का कुणास ठाऊक हे होणार होतं की नाही माहित नाही…! असो…

मी बंद असलेली कवाडं उघडताच वादळ मला म्हणालं… ये कवेत माझ्या नी

प्रकाशीत हो या लख्ख विजांच्या प्रकाशात आणि वाहू दे तुझ्या सर्वांगातून

या विजांची प्रचंड शक्ती… झेलून बघ प्रचंड शक्तीचे काटेरी थेंब आणि मग बघ कसं जागृत होईल तुझं तन आणि मन… हे घे वाऱ्याचे पंख आणि मार एक उंच झेप इतकी उंच की फक्त ठिपकेच दिसायला लागतील तुला जगात…!

मी म्हणाले ” अरे वेडया.. ! कशाला करतोस इतका थयथयाट ? बेभान होऊन आदळत असतोस घरादारांवर… उध्वस्त करत फिरतोस सगळं…अरे थकशील की काहीच वेळात… पण तुला सांगते शांततेची शक्तीच वेगळी असते बरं..!

कुठे गर्व करत बसतोस या विजांचा आणि या थेंबांचा… या विजांचा प्रकाश आणि कडकडाट सहन व्हायचा नाही तुला फार वेळ… हे थेंब देखील बोचायला लागतील हो आणि सगळं जग एक ठिपका दिसेपर्यंत जायचंच कशाला उंच ? उंचीवर घेऊन जाशील खरं पण तितक्याच जोरात जमिनीवर आदळशील त्याचं काय…. याचा विचार केलाय का कधी… असो

नकोच तुझ्या शब्दात येणं… आता तूच ये माझ्या अथांग गहिऱ्या मनात..

कदाचित तूच शांत होशील… मानसरोवरावर वाहणाऱ्या शांत वाऱ्यासारखं…

माझ्या बोलण्याला वादळ भूललं नी मला म्हणालं “इतकं शांत, नाजूक, निर्मळ तुझं मन माझ्यासारख्या तुफानाला सामावून घेऊ शकेल ?

वादळाला मी माझ्यात सामावून घेतलं… बाहेरचं वादळ शांत झालं खरं पण मी मात्र स्वतःच वादळ झाले… !

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी—ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा