*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त सुमंदारमाला*
*कळ्यांना फुलू दे*
पहाटे पहा गार वारा वहातो परी अंगणी हे धुके दाटले
मलाही तुलाही सख्या साजणीला धरा ही जणू स्वर्गची भासले
तरूवर नि वेली फुलांवर पहावे दवांकुर कसे भाळुनी हासले
जसा मोतियांचा भरावाच मेळा तसे माळरानात दव सांडले
अशा या नयनरम्य उदयीक वेळी तुझा हात हातात वाटे धरू
तुझ्या अंतरीच्या कळ्यांना फुलू दे, मनाला उडू दे जसे पाखरू
तुझे वागणे अन् तुझे बोलणे ही अजूनी पहाते चिरंतर ठरू
सखे साथ चालू, कटू गोड साऱ्या पुन्हा एकदा त्या स्मृतींना स्मरू
जरा गोठला रात्र दिवसास पारा, नदी गोठली उष्ण वाफा उरी
हवा गार झाली तसा स्पर्श मजसी तुझाही अता भासला भरजरी
मिठी घट्ट झाली तुझ्या भोवतीची तसे ओठ मिटले जशी लाजरी
जरासा मिळालाच एकांत मजसी नि सामावला देह देहांतरी
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
