प्रगतीशील बागायतदार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ आधारस्तंभ यशवंत सावंत-भोसले यांचे निधन
भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांना पितृशोक
सावंतवाडी —
येथील भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचे वडील आणि यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, ज्येष्ठ शिक्षणप्रेमी व प्रगतीशील बागायतदार यशवंत सावंत-भोसले (वय ९२) यांचे काल रात्री गोवा येथील मणीपाल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. यशवंत सावंत-भोसले यांनी आपल्या आयुष्यात शेती व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. एक यशस्वी बागायतदार म्हणून त्यांनी आधुनिक व प्रयोगशील शेतीची ओळख निर्माण केली होती. त्याचबरोबर यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. शिक्षण संस्था सक्षमपणे उभारण्यात आणि त्यांना दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन मुली, जावई, भाऊ, भावजय, पुतणे तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने भोसले नॉलेज सिटी, संलग्न शैक्षणिक संस्था आणि सावंत-भोसले परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचे पार्थिव आज सकाळी १०.३० वाजता शिरवल (ता. दोडामार्ग) येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार असून तेथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने दोडामार्ग तालुक्यासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
