अवैध पार्किंगमुळे जीव गेला!
मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी टेंबे (धुरी नगर) येथे मुंबई–गोवा महामार्गावर आज सकाळी सुमारे ९:४५ वाजता झालेल्या भीषण अपघातात आशा सोनू धुरी (वय ६२) यांचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच. ५८-०१८९ क्रमांकाच्या मारुती सुझुकी XL6 कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी होती की धडक बसताच त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील अवैध पार्किंगविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक्स व मोठ्या वाहनांमुळे दृष्टीआड होऊन वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या वाहनांमुळे रस्ता ओलांडणारे तसेच वाहनचालक यांना समोरून येणारी वाहने दिसत नसल्याचेही सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, स्थानिकांच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक पोलिसांनी महामार्गावर अवैधपणे पार्क केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
या घटनेमुळे धुरी नगर व पिंगुळी परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील अवैध पार्किंगचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी जोरदार मागणी होत आहे.
