गझल सप्ताहानिमित्त.. येत्या सात व आठ फेब्रुवारीला गझल सम्राट स्व. सुरेश भटांच्या अमरावतीला राज्यस्तरीय गझल साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त पहिला लेखांक
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गझल पोहोचविणारा कवी स्व. सुरेश भट
आज महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात घरादारात प्रसारमाध्यमांमध्ये राजकारणामध्ये गझल पोचविण्याचे काम ज्या गजलसम्राटाने केले त्यांचे नाव आहे कविवर्य स्वर्गीय सुरेश भट. अमरावतीला सुरेश भटांच्या या नगरीत येत्या शनिवार व रविवार दिनांक सात व आठ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सगळ्यात भव्य अशा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये हे गझल संमेलन संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित गझल सप्ताहानिमित्त सुरेश भटांना वाढलेली ही आदरांजली. आज अमरावती शहरामध्ये जुन्या काळातील लेखक व कवी म्हणून स्व. सुरेश भट स्व. उद्धव शेळके प्राचार्य डॉ. भाऊ मांडवकर स्व.प्रा. मधुकर केचे स्व. शरदचंद्र सिन्हा स्व. उषाताई चौधरी सिंधुताई मांडवकर स्व. बाबा मोहोड स्व. सुदाम सावरकर स्व.सुभाष सावरकर यांचा नावलौकिक आहे. पण जुन्या काळातील या सगळ्या साहित्यिकांमध्ये सुरेश भटांनी गझलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गजलेच्या संदर्भात जनजागृती केली त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. सुरेश भटांची गझल ही मराठीच्या साहित्य प्रांतात मैलाचा दगड ठरली आहे. त्यांचे कितीतरी शिष्य व त्या शिष्यांचे शिष्य आता गझल लिहायला लागले आहेत व गझल लोकाभिमुख करीत आहेत. सुरेश भटांनी जर हा पुढाकार घेतला नसता तर कदाचित महाराष्ट्र गजलेच्या बाबतीत समृद्ध व्हायला अजून विलंब लागला असता.
गझल लिहिणाऱ्यांची एक पिढी निर्माण करण्याचे श्रेय कविवर्य सुरेश भट यांना जाते. एवढा मोठा कवी पण गझलेसाठी त्यांनी आपला प्राण ओतला. आणि गझल लोकाभिमुख करून दाखविली. गझल लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी गरलेची बाराखडी नावाचे लिखित फोल्डर तयार केले होते.ते अनेकांना पाठविले. अनेक कवी गझल लिहायला लागू लागले आणि लिहिलेली गझल सुरेश भटांकडे दुरुस्तीला पाठवू लागले. भटसाहेब म्हणजे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि साहित्यामध्ये व्यस्त असे व्यक्तिमत्व .पण त्यांनी गजलेसाठी वेळ काढला. नवोदितांच्या गजला तपासून देणे त्यांना फोन करून प्रोत्साहन देणे आणि घरी आलेल्यांना गझल समजावून देणे हे काम त्यांनी केले व आज ते फलद्रूप झालेले आहे.
गजलेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांनी केले आहे. तळागाळातील ग्रामीण भागातील दुर्गम भागातील कवी गझल लिहायला लागले आहेत. कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांनी जी गझल लोकाभिमुख केली त्याचा हा दृश्य परिणाम आहे.
कविवर्य सुरेश भटांना त्यांच्या काळात बराच संघर्ष करावा लागला. आजच्यासारखी गजलेला अनुकूल असलेली परिस्थिती त्या काळात नव्हती. आज कवीला खऱ्या अर्थाने चांगले भाव आलेले आहेत. चांगले मानसन्मान प्राप्त व्हायला लागले आहेत .पण सुरेश भटांचा तो काळ तसा नव्हता. कवितेकडे एवढ्या सन्मानाने पाहल्या जात नव्हते. कवी हा दुर्लक्षित इसम अशी लोकांची धारणा होती. पण या धारणेला शह दिला तो कवीश्रेष्ठ श्री सुरेश भटांनी. त्यांनी कविता व गझल या माध्यमातून महाराष्ट्रातील नव्हे देशातील व प्रदेशातील मराठी भाषिकांच्या मनावर आपला जम बसविला व आपल्या कविता व गजला सर्वदूर पोहोचविल्या.
आज सुरेश भट आपल्यात नाही पण त्यांच्या अनेक कविता आणि गजला चित्रपटातून यूट्यूबच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. अनेक लोकप्रिय गीत आणि गजला त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी पुढील काही कवितांचे व गजरांचे मुखडे देत आहे
1/ आज गोकुळात रंग टाकतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी 2/उष : काल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली 3/ मेहंदीच्या पानावर मन माझं झुलते ग 4/हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणील आरतीला हे चंद्र सूर्य तारे
5/ घे भीमराया या लेकरांची वंदना 6/सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे 7/ मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
8/ भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले 9/जगत मी आलो असा की पुन्हा जगलोच नाही एकदा तुटलो असा की पुन्हा जुळलोच नाही 10/आता जगावयाचे माझे किती दिन राहिले 11/ हे हिंदु हृदय सम्राटा हा छगन करी तुझं टाटा ह्या व इतर अनेक कवितांनी व गजलांनी त्यांनी मराठी माणसाच्या हृदयावर ताबा मिळविला आहे. आज जरी ते जिवंत नसले तरी त्यांचे गझल व कवितेच्या क्षेत्रातील कर्तृत्व अनन्यसाधारण आहे व राहिलही.
सुरेश भट तसे अमरावतीचे. अमरावतीच्या मातीत त्यांची कविता फुलली. त्यांची कविता विकसित झाली. सर्वश्री अरविंद ढवळे रामदास भाई श्राफ डॉ.मोतीलाल राठी दादा इंगळे वली सिद्दिकी सारख्या त्यांच्या मित्रांनी त्यांच्या कवितेला गजलेला खतपाणी घातले. पण सुरेश भट खरे प्रसिद्ध झाले ते नागपूरला गेल्यानंतरच. नागपूरमध्ये ते नियमितपणे दैनिक लोकमतला लिहायला लागले. बहुमत नावाचे साप्ताहिक त्यांनी काढले. गावोगावी रंग माझा वेगळा या शीर्षकाखाली त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. अगदी गोंदिया पासून तर गोव्यापर्यंत या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राबाहेर कर्नाटकमध्ये बेळगाव येथे दैनिक तरुण भारतचे प्रसिद्ध पत्रकार श्री किरण ठाकूर यांनी बेळगावमध्ये हा रंग माझा वेगळा कार्यक्रम घडवून आणला. तसेच कोल्हापूरला श्री श्रीराम पचिंद्रे व गोकुळ डेअरीचे तत्कालीन चेअरमन श्री अरुण नरके यांनी कोल्हापूरला संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात हा कार्यक्रम घडवून आणला.
सुरेश भटांच्या कवितेमध्ये गझलमध्ये दमदारपणा तर होताच. पण ती गझल ती कविता पेश करण्याची त्यांची अदा आगळीवेगळी होती. त्यांच्या समर्थ सादरीकरणामुळे त्यांनी सादर केलेली गझल लोकांच्या हृदयात जाऊन बसायची. दमदारपणे लिहिणे व तितक्याच दमदारपणे ती व्यक्त करणे याला खूप ताकत लागते. पण या दोन्ही कला कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांना प्राप्त झाला होत्या.
कवी श्रेष्ठ सुरेश भटांनी गझलकारांची एक पिढी तयार केली त्यामध्ये सर्वश्री प्रदीप निफाडकर श्रीराम मच्छिंद्रे ज्योती बालिगा सुरेश वैराळकर श्रीकृष्ण राऊत सुप्रसिद्ध गजल नवाज श्री भीमराव पांचाळे
विदर्भाचे बालगंधर्व श्री सुधाकर कदम म.भा. चव्हाण बबन सराडकर कविता डवरे प्रा. गंगाधर पुसतकर अरुण सांगोळे विष्णू सोळंके चांदूर बाजारचे श्री नितीन देशमुख आबिद शेख पल्लवी उमरे अशी कितीतरी नावे घेता येतील. या सर्वांसाठी सुरेश भट यांनी भरपूर वेळ दिला. त्यांच्याशी गजलेवर चर्चा करणे. त्यांच्या गजला तपासून देणे आणि त्या वेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आणणे तसेच श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम यांचे ठिकठिकाणी कार्यक्रम घडवून आणणे यासाठी देखील सुरेश भटांनी आपला शब्द वापरला. आणि म्हणूनच ते गजलेच्या रूपाने व त्यांच्या शिष्यांच्या रूपाने आज अजरामर झालेले आहेत.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
