You are currently viewing आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रा आणि मतमोजणी एकाच दिवशी
Oplus_16908288

आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रा आणि मतमोजणी एकाच दिवशी

संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज, नागरिकांना संयम व सहकार्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या मतदान व मतमोजणीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

या बदलानुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित असलेली मतमोजणी आता ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.

दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजीच कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. एकाच दिवशी मतमोजणी आणि देवीची जत्रा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाहीचा उत्सव आणि श्रद्धेचा महोत्सव एकाच दिवशी साजरा होत असताना संयम, शिस्त व सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केले आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षा, वाहतूक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन आवश्यक असणार आहे. आंगणेवाडी जत्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच जिल्ह्याबाहेरून लाखो भाविक दाखल होतात. त्यामुळे रस्ते, वाहतूक मार्ग, सार्वजनिक सेवा आणि सुरक्षेवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याअनुषंगाने, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांनी व भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात अनधिकृत गर्दी करू नये, कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास मतमोजणी प्रक्रिया आणि आंगणेवाडी जत्रेचे नियोजन शांततेत व सुरळीत पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा