*महिलांना व चिमुकल्याला प्रसाधनगृह वापरण्यास नकार — प्रशासन गप्प, नियम केवळ कागदावर?*
*मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये महिला व बालहक्कांची निर्लज्ज पायमल्ली*
रोहा (जि. रायगड) (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जर महिलांना व लहान मुलांना प्रसाधनगृहासारख्या मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर हा प्रकार केवळ धक्कादायक नसून माणुसकीला काळिमा फासणारा आहे. रोहा तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेमुळे महिला सुरक्षा, बालहक्क आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र व संतप्त प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९:४५ वाजता, महाबळेश्वर येथून मुंबईकडे येणाऱ्या ४० प्रवाशांच्या गटाला (यामध्ये ७ महिला व एक दोन वर्षांचा चिमुकला यांचा समावेश होता) माणगाव येथे जवळपास दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. दीर्घ प्रवास, थकवा आणि अस्वस्थतेमुळे प्रवाशांनी जेवण व प्रसाधनगृहासाठी रोहा तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या ‘हॉटेल मालवणी’ येथे थांबण्याचा निर्णय घेतला.
मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्याने “मोठ्या गाड्या येथे घेत नाही” असे सांगत जेवण देण्यास नकार दिला. प्रवाशांनी तो निर्णय मान्य करून, आपत्कालीन परिस्थितीत महिलांना व लहान मुलाला प्रसाधनगृह वापरण्याची परवानगी द्यावी, अशी नम्र विनंती केली. त्यावर संबंधित कर्मचाऱ्याने महिलांशी अरेरावीची भाषा वापरत, जोरजोरात वाद घालत प्रसाधनगृह वापरण्यास थेट मनाई केली.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आस्थापनांनी प्रवाशांना—विशेषतः महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना—प्रसाधनगृहासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये, हे शासकीय नियम स्पष्ट असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रकार केवळ नियमभंग नसून महिला व बालहक्कांची उघड पायमल्ली आहे आणि तो मानवी प्रतिष्ठेवर केलेला थेट आघात मानला जात आहे.
प्रवाशांच्या सोयी, सुरक्षितता आणि सन्मानासाठी जबाबदार असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, स्थानिक प्रशासन व संबंधित यंत्रणा नेमक्या कुठे आहेत? महामार्गालगत सुरू असलेल्या हॉटेल्सवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची, आणि ती जबाबदारी प्रत्यक्षात पार पाडली जाते की नाही, असा थेट व संतप्त सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. नियम अस्तित्वात असतील, तर त्यांची अंमलबजावणी का होत नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
सदर प्रकरणी संबंधित हॉटेलवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात कोणत्याही महिलेला, बालकाला किंवा ज्येष्ठ नागरिकाला अशा अमानवी वागणुकीला सामोरे जावे लागू नये, यासाठी महामार्गालगतच्या सर्व आस्थापनांना स्पष्ट व सक्त निर्देश देण्यात यावेत, अशी जोरदार मागणी विजय अंधारे यांच्या वतीने करण्यात आली आहे. माणुसकीऐवजी मुजोरी सहन केली जाणार असेल, तर महामार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित कसा राहील, हा प्रश्न आता प्रशासनासमोर ठामपणे उभा ठाकला आहे.
