You are currently viewing घारपी शाळेत ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

घारपी शाळेत ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

*घारपी शाळेत ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*

बांदा

घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह, शिस्त व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेच्या ध्वजस्तंभाजवळ ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करत तिरंग्याला मानवंदना दिली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात शिस्तबद्ध रचनेत उभे राहून “७७” असा भव्य आकार साकारला. ७७व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साकारलेला हा उपक्रम उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या या अभिनव रचनेतून देशप्रेम, एकजूट आणि शिस्तीचे प्रभावी दर्शन घडले.
यानंतर प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करणारी भाषणे घेण्यात आली. भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य, समता व बंधुता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, कविता व भाषणांच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली. देशप्रेमाने ओतप्रोत असलेल्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांच्यासह सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे व मुरलीधर उमरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी तसेच अंगणवाडी सेविका यांनीही कार्यक्रमाच्या यशात मोलाचा सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी संविधानाचे पालन करण्याचा, देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा व जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प केला

प्रतिक्रिया व्यक्त करा