कणकवलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का;
युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे यांचा राजीनामा
कणकवली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका युवक अध्यक्ष नयन गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
वागदे गावातील काही ग्रामस्थांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली असून, आपल्या घरातीलच भेदी असल्याच्या भावनेतून आपण पदाचा राजीनामा दिल्याचे नयन गावडे यांनी स्पष्ट केले. मात्र, राजीनामा दिला असला तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून यापुढेही सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पुढे बोलताना गावडे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत कायमस्वरूपी उभे असून महाविकास आघाडीचा धर्म पाळत निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या घडामोडीमुळे कणकवली तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
