You are currently viewing निवडणुकीआधीच महायुतीचा जल्लोष

निवडणुकीआधीच महायुतीचा जल्लोष

जि.प. ते पंचायत समितीपर्यंत भाजप–महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजयाचा धडाका

कणकवली–देवगडमध्ये भाजप-महायुतीचे वर्चस्व ठाम

कणकवली :

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष व महायुतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपले राजकीय वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये भाजप व महायुतीच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवत निवडणुकीपूर्वीच यशाचा गुलाल उधळला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत बिनविरोध यश

खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून प्राची इस्वलकर, बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषद मतदारसंघातून सुयोगी रविंद्र घाडी, तर बापर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून अवनी अमोल तेली यांनी बिनविरोध विजय संपादन केला आहे.

विशेष म्हणजे, जाणवली जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या रुहिता राजेश तांबे यांनी शिवसेनेच्या उमेदवार म्हणून बिनविरोध निवड होत महायुतीची ताकद अधिक अधोरेखित केली आहे.

पंचायत समिती निवडणुकीतही कणकवली तालुक्यातील वरवडे पंचायत समितीमधून भाजपचे सोनू सावंत यांची तर बिडवाडी पंचायत समितीमधून संजना संतोष राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तसेच देवगड तालुक्यात — भाजप पक्षाचे पडेल पंचायत समिती मधून अंकुश यशवंत ठुकरुल, नाडण पंचायत समिती मधून गणेश सदाशिव राणे आणि बापर्डे पंचायत समिती मधून संजना संजय लाड यांनी बिनविरोध बाजी मारली आहे.

तर वैभववाडी तालुक्यात कोकिसरे पंचायत समिती मधून साधना सुधीर नकाशे यांचीही बिनविरोध बाजी मारली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या या निकालांमुळे निवडणूक रिंगणात भाजपाने मतदानाआधीच आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याचे स्पष्ट झाले आहे. या बिनविरोध निवडींमुळे भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा