ठाकरे सेनेच्या माघारीनंतर प्राची इस्वालकर बिनविरोध
कणकवली :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यात भाजपाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे सेनेच्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या प्राची इस्वालकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेला सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक राजकीय धक्का बसला आहे.
या निकालासह कणकवली तालुक्यात भाजपाकडून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या आता तीन झाली असून, संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघात ही संख्या चार वर पोहोचली आहे. यामुळे स्थानिक राजकारणात भाजपाची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘दे धक्का’ तंत्राची चर्चा केवळ मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्यभर रंगू लागली आहे. मीनल तळगावकर यांच्या माघारीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विशेष म्हणजे शनिवार असूनही निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणूक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत आणखी कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यापूर्वी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार उज्ज्वला चिके यांनी अर्ज मागे घेतला होता. त्यानंतर आज ठाकरे सेनेच्या एकमेव विरोधी उमेदवारानेही माघार घेतल्याने प्राची इस्वालकर या एकमेव उमेदवार म्हणून राहिल्या.
दरम्यान, २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ‘दे धक्का’ तंत्राचा आणखी परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
