You are currently viewing स्वतःच्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल

स्वतःच्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल

*स्वतःच्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल*

*ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह : ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘विश्वनाथ स्पोर्ट मिट’ला प्रारंभ*

पुणे :

जीवनात अनेकदा गोष्टी आपल्याला हव्या तशा, मनाप्रमाणे होत नाहीत. कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यात यश-अपयश ही न टाळता येणारी गोष्ट आहे. यशाने हरखून न जाणे आणि अपयशाने न खचणे हीच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट खेळ आपल्याला शिकवतो. त्यामुळे कुठलाही खेळ निवडा, तो सातत्य, चिकाटी आणि स्वतःतील सर्वोत्तम देऊन खेळा. अपयशासाठी कोणालाही दोष न देता जबाबदारी घेऊन स्वतःच्या चुकांवर काम केल्यास, खेळ कुठलाही असो, यश निश्चित मिळतेच, असे मत ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांनी व्यक्त केले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., एव्हरेस्टवीर डॉ. सारा सफारी, अर्जुन पुरस्कारप्राप्त मुष्ठीयोद्धा मनोज पिंगळे, प्र-कुलपती डॉ. रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, स्पर्धेच्या सह-समन्वयक डॉ. प्रतिभा जगताप आदी उपस्थित होते.

विजेंदर सिंह पुढे बोलताना म्हणाले की, सध्या भारतात क्रीडा क्षेत्राचा सुवर्णकाळ सुरू आहे. पूर्वी पालक आपल्या पाल्याला अभ्यासाकडे लक्ष दे असे दडपण आणून सांगायचे; मात्र आता त्याला क्रीडा क्षेत्राकडे वळण्यास प्रोत्साहित केले जाते. अशा परिस्थितीत एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून एवढ्या मोठ्या स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे नक्कीच प्रेरणादायी आहे. विद्यापीठातील क्रीडा सुविधाही जागतिक दर्जाच्या असल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

प्रा. डॉ. सुनीता कराड यावेळी म्हणाल्या की, भारतातील क्रीडा संस्कृतीत वेगाने प्रगती होत आहे. सध्या आयोजित ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे पुण्यातील वातावरण क्रीडामय झाले आहे. भारतासह महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती रुजवून ऑलिंपिक, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा टक्का आणखी वाढला पाहिजे; यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. ग्रामीण तसेच शहरी भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी विद्यापीठ स्तरावरच एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या माध्यमातून केला जात आहे. त्याच उद्देशाने एमआयटी एडीटी विद्यापीठात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेटतर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी केले, तर आभार प्रा. पद्माकर फड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. अशोक घुगे, डॉ. स्वप्निल शिरसाट आणि प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.

चौकट :
*यशासाठी सातत्य आवश्यक – विनित कुमार*
विनित कुमार यावेळी म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत आपले नैपुण्य दाखविल्यानंतर अनेक खेळाडू कुठेतरी मागे पडतात. त्यामुळे हार न मानता विद्यार्थ्यांनी खेळात सातत्य राखायला हवे. खेळातील सातत्य कायम ठेवण्यासाठी आणि खेळाडूंनी महाविद्यालयीन जीवनातच चांगले व्यासपीठ मिळवण्यासाठी व्हीएसएमसारख्या स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) प्रतिभावान खेळाडूंना व व्हीएसएमसारख्या स्पर्धांना कायमच प्रोत्साहन देत राहील, असेही ते म्हणाले.

*खेळाचा आनंद घ्यायला शिका – तृप्ती मुरगुंडे*
एकविसाव्या शतकात खेळाची परिभाषा पूर्णपणे बदलली आहे. भारतातही उत्तम क्रीडा संस्कृती रुजली आहे. भारत सरकारच्या फिट इंडिया, खेलो इंडिया यांसारख्या कार्यक्रमांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक खेळाडूंनी जागतिक पातळीवर पदके जिंकून भारताचा सन्मान वाढविला आहे. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊ नका. स्वतःला ओळखा, आत्मपरीक्षण करा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे खेळाचा आनंद घ्यायला शिका, असे बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा