वरवडे पंचायत समितीत सोनू सावंत बिनविरोध; ठाकरे गटाला दुसरा धक्का
कणकवली :
कणकवली तालुक्यात पंचायत समिती निवडणुकीचा रंग चढत असतानाच भारतीय जनता पार्टीकडून बिनविरोध निवडींचा सिलसिला सातत्याने सुरू आहे. बिडवाडी पंचायत समितीत उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर आता वरवडे पंचायत समितीत भाजपचे अधिकृत उमेदवार सोनू सावंत बिनविरोध निवडले गेले आहेत.
वरवडे पंचायत समितीमध्ये सुरुवातीला तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र ठाकरे गटाचे सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साधे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता एकमेव उमेदवार म्हणून सोनू सावंत यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून अधिकृत घोषणा निवडणूक विभागाकडून होणे बाकी आहे.
या घडामोडीमुळे कणकवली तालुक्यात ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत भाजपच्या कणकवली मतदारसंघात बिडवाडी पंचायत समिती, वरवडे पंचायत समिती तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समिती या तीन जागा भाजपकडे बिनविरोध आल्या आहेत.
तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि रणनीती यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागत असल्याचे चित्र सध्या कणकवली परिसरात दिसून येत आहे.
