नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक
कोळंबी उत्पादकांच्या प्रश्नांसाठी नितेश राणे आक्रमक
कणकवली
नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील कोळंबी उत्पादक आणि मच्छिमारांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाचा विकास आणि कोळंबी उत्पादकांना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली. कोळंबी उत्पादनात राज्याला आघाडीवर नेण्यासाठी केंद्राने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
या बैठकीत प्रामुख्याने कोळंबी बीजांची उपलब्धता आणि आयात प्रक्रियेतील तांत्रिक अडथळ्यांवर चर्चा झाली. नितेश राणे यांनी कोळंबी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडतानाच, आयात प्रक्रिया सुलभ करण्याची गरज व्यक्त केली. कोळंबी उत्पादनासाठी आवश्यक असलेले जिवंत खाद्य आणि इतर तांत्रिक बाबींवर चर्चा करताना त्यांनी जैवसुरक्षेचे नियम पाळून उत्पादकांना दिलासा देण्याची विनंती केली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मत्स्यव्यवसायाला मोठी संधी असल्याने केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला. या महत्त्वाच्या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांच्यासह मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, आयसीएआरचे शास्त्रज्ञ आणि निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. नितेश राणे यांनी मांडलेल्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्रातील कोळंबी उत्पादनाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, यामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
