जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक : अर्ज भरण्यासाठी कणकवलीत लगबग
अर्ज भरण्याची अंतिम घंटा
कणकवली :
कणकवली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात सकाळपासूनच मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. सकाळी १० वाजल्यापासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवा-जुळव करत तहसील कार्यालयात गर्दी केली आहे.
निवडणूक अधिकारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारणार असल्याने अर्ज भरण्यासाठी अवघे चार तास शिल्लक आहेत. उमेदवारी अर्जासोबत विविध दाखले व प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असल्याने उमेदवारांची तारांबळ उडताना दिसत आहे.
भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार आज अर्ज दाखल करण्यासाठी कणकवली तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. त्यामुळे तहसील परिसरात मोठी गर्दी होऊन निवडणुकीची धामधूम स्पष्टपणे जाणवत आहे.
