जिव्हाळा सेवाश्रमात मोफत फिजिओथेरपी शिबिर बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५व्या जयंतीचे औचित्य
कुडाळ :
बॅरिस्टर नाथ पै यांच्या ५५व्या जयंतीनिमित्त श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर बॅरिस्टर नाथ पै संस्था, सिंधुदुर्ग, बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट व जिव्हाळा सेवाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले.
या शिबिरामध्ये वृद्ध, अपंग व गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत फिजिओथेरपी उपचार देण्यात आले. अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे, सदस्य अरुण, सल्लागार समिती सदस्य जयप्रकाश प्रभू, भाविदास गावडे व प्राजक्ता केळुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे कौतुक करताना श्रीमती ओटवणेकर म्हणाल्या की, जिव्हाळा सेवाश्रमामार्फत गरजू व दुर्लक्षित घटकांसाठी राबविले जाणारे सामाजिक उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी आहेत. बॅरिस्टर नाथ पै यांच्या सामाजिक विचारांना व कार्याला अभिवादन करण्याचा हा उपक्रम असून, भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
