देवगड मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ५५ अर्जांचे वितरण
आतापर्यंत ९७ इच्छुक उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज ; मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही
मनसेनेही घेतले आहेत दोन उमेदवारी अर्ज
देवगड
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वितरित करण्याची प्रक्रियेस सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण ९७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. आज मंगळवारी एकूण ५५ जणांनी अर्ज खरेदी केली. अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. उद्याचा एकच दिवस शिल्लक असून उद्या अर्ज खरेदी व उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असणार आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी जि प गटासाठी एकूण २१ अर्ज तर पंचायत समिती गणासाठी करता एकूण ३४ अर्ज असे एकूण ५५ अर्ज आज खरेदी झाले आहेत. यामध्ये भाजपने जिल्हा परिषदेसाठी ११ तर पंचायत समितीसाठी १६, अपक्ष जि प २ पं स १, काँग्रेस जि प २ तर शिवसेना पं स २, उबाठा शिवसेना जि प ५ पं स १४,मनसे जि प १ पं स १ असे ५५ अर्ज आज खरेदी केले आहेत.
आतापर्यंत पंचायत समिती व जिल्हा परिषद मिळवून भाजपकडून ४७, उबाठा शिवसेनेकडून २८,अपक्ष १०,काँग्रेस ७,शिवसेना ३, मनसे २ असे ९७ अर्ज खरेदी करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून यावेळी किती उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे.

