फोंडाघाट इंग्रजकालीन पुलाला अखेरची सलामी; उद्यापासून पाडकाम सुरू
फोंडाघाट
फोंडाघाट येथे रुंदीकरणाच्या कामासाठी इंग्रजकालीन जुना पूल पाडण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत असून आज या ऐतिहासिक पुलाला अंतिम विदाई देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुलावर उभे राहून दर्शन घेणे, आठवणी जपण्यासाठी सेल्फी काढणे यासाठी विशेषतः तरुण व मुलांची रांग लागली होती.
पुलाचे पाडकाम सुरू होण्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने कंत्राटदारांनी शिट्टी वाजवून धोक्याच्या सूचना दिल्या. मात्र, या पुलाशी जोडलेल्या आठवणींमुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले. कोणतीही दुःखद घटना घडल्यास त्याचा फटका कंत्राटदारासह संपूर्ण प्रकल्पाला बसू शकतो, त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
हा पूल थेट ग्रामपंचायतीसमोर असल्याने सुरक्षिततेबाबत विशेष दक्षता घेण्यात येत आहे. कंत्राटदारांनी अवघ्या एक महिन्यात पुलाचे काम पूर्ण करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी एक महिन्याचा थोडाफार त्रास सहन करावा, असे आवाहन सरपंच सौ. संजना आग्रे यांनी केले.
ऐतिहासिक वारशाचा साक्षीदार असलेल्या या पुलाला आज फोंडाघाटकरांनी भावनिक निरोप दिला.
— अजित नाडकर्णी, शुभांजित श्रुष्टी
