फोंडाघाटमध्ये थंडीची लाट; वर्षातील नीचांकी तापमानाची नोंद
फोंडाघाट
फोंडाघाट परिसरात आज तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने संपूर्ण भागात तीव्र थंडीची लाट अनुभवास येत आहे. यामुळे नागरिकांना यंदाच्या वर्षातील खरी थंडी जाणवत असून हे आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान असल्याचे बोलले जात आहे.
फोंडाघाटपेक्षा दाजीपूर परिसरात थंडी अधिक तीव्र असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोट्या पेटविलेल्या दिसून येत आहेत. अचानक वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
याबाबत फोंडाघाट येथील डॉक्टर शैलेद्र आपटे तसेच इतर डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंडीच्या काळात गरम पाणी पिणे, उबदार कपडे वापरणे आणि प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान अभ्यासकांच्या मते, यावर्षी सर्वाधिक पाऊस, सर्वाधिक थंडी तसेच तीव्र उन्हाळाही अनुभवास येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
— अजित नाडकर्णी, शुभांजित सृष्टी
