You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर तातडीची भरती करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर तातडीची भरती करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर तातडीची भरती करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

ट्रामा केअर, आयसीयू व रक्तपेढीतील कमतरतेवर तात्काळ उपाययोजनांचे उपसंचालकांना आदेश;

कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे निर्देश

सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट, आयसीयू, रक्तपेढी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, असे स्पष्ट आदेश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज गारगोटी येथील आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन रुग्णालयातील गंभीर प्रश्न मांडले. या शिष्टमंडळात कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड, मल्टीस्पेशालिटी जागा मालक रविंद्र केरकर, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नंदन वेंगुर्लेकर, बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त अधिकारी संपत दळवी यांचा समावेश होता.
यावेळी रविंद्र ओगले यांनी अभिनव फाऊंडेशनने दाखल केलेली जनहित याचिका, उपजिल्हा रुग्णालयातील नऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, ट्रामा केअर युनिटमधील सर्व पाच पदे रिक्त असणे, आवश्यक सोयीअभावी रुग्णांना गोवा-बांबुळी येथे पाठवण्याची वेळ येणे तसेच रखडलेला मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा प्रश्न याकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
कृती समितीच्या वतीने आरोग्यमंत्री आबिटकर यांना निवेदन सादर करण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रश्नांबाबत 26 जानेवारी रोजी रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात आला. गरज भासल्यास मंत्रालयस्तरावर बैठक घेण्याबाबतही चर्चा झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न प्रलंबित असून गंभीर रुग्णांवर जिल्ह्यात उपचार होत नसल्याने त्यांना बांबुळी किंवा कोल्हापूर येथे हलवावे लागते. हा जीवघेणा प्रवास तातडीने थांबवावा, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी तत्काळ उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याच्या आणि कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून तातडीने मार्ग काढण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा