मोगल मर्दानी शिवस्नुषा ताराराणी यांच्या शौर्याने मालवणकर मंत्रमुग्ध…
डॉ. ज्योती तोरसकर यांनी उलगडला जाज्वल्य इतिहास ; व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद…
मालवण
श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने आयोजित कै. श्रीपाद वाघ पुरस्कार व कै. राजाभाऊ भोसले स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प काल गुंफण्यात आले. दत्त मंदिर प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात ‘मोगल मर्दानी, शिवस्नुषा ताराराणी’ या विषयावर इतिहासाचे तेजस्वी सुवर्णपान पुन्हा एकदा उजळून निघाले.
मुख्य वक्त्या डॉ. सौ. ज्योती तोरसकर यांनी महाराणी ताराराणी यांचा पराक्रमाने ओथंबलेला इतिहास अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने आणि धारदार वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला. तोरसकर यांचे प्रत्येक वाक्य जणू शब्दांची समशेर उगारल्यासारखे भासत होते. रणांगणावर घोड्याच्या टापांइतक्याच वेगाने धावणारी त्यांची शैली आणि धगधगत्या इतिहासाचे वर्णन यामुळे प्रत्यक्ष ताराराणींचे व्यक्तिमत्त्व मंचावर अवतरल्याचा भास निर्माण झाला.
दत्त मंदिर प्रांगणात उपस्थित असलेला प्रत्येक श्रोता या व्याख्यानाने मंत्रमुग्ध झाला होता. ताराराणींच्या शौर्याची आणि राष्ट्रनिष्ठेची गाथा ऐकताना उपस्थित जनसमुदाय स्तब्ध झाला होता. या व्याख्यानाने केवळ इतिहासाची उजळणी केली नाही, तर प्रत्येकाच्या मनात स्वराज्याची ज्वाला पुन्हा एकदा प्रज्वलित केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका श्रीमती शर्वरी पाटकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रभुदास आजगांवकर यांनी केले. या व्याख्यानमालेला मालवणमधील इतिहासप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
