You are currently viewing मालवणमध्ये सिंगल युज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई

मालवणमध्ये सिंगल युज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई

मालवणमध्ये सिंगल युज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई;

५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वच्छता विभागाच्या कारवाईचे केले कौतुक

मालवण
मालवण नगरपरिषद प्रशासनाने बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्यांविरोधात मोठी कारवाई करत रिक्षा टेम्पोसह सुमारे ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई रविवारी मालवण मच्छिमार्केट येथील मासे लिलाव परिसरात करण्यात आली.
मच्छिमार्केट परिसरात सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांची होलसेल विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वच्छता निरीक्षक संजय पवार, आरोग्य लिपिक मंदार केळूसकर व कर्मचारी सागर जाधव यांनी संयुक्त कारवाई केली. तपासादरम्यान पांढऱ्या रंगाच्या रिक्षा टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. हा साठा कट्टा येथून आणल्याची माहिती मिळाली आहे.
कारवाई पथकाने संबंधित रिक्षा टेम्पो व प्लास्टिक पिशव्यांचा साठा ताब्यात घेऊन मालवण नगरपरिषद कार्यालयात जमा केला आहे. संबंधितांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, पुन्हा असे प्रकार आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी दिला.
बंदी असलेले प्लास्टिक पर्यावरणासाठी अत्यंत घातक असून ते विघटनशील नसल्यामुळे शेकडो वर्षे पर्यावरणात टिकून राहते. त्यामुळे प्रदूषण वाढते, ड्रेनेज व्यवस्था अडथळित होते तसेच जनावरे व मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ही कारवाई मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वच्छता विभागाच्या या कारवाईचे कौतुक केले असून, मालवण शहर व नागरिकांच्या हितासाठी तसेच शहरविकासासाठी नगरपरिषद प्रशासनासोबत नेहमीच सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा