*पहिला वन जैवविविधता महोत्सव पणजीत उत्साहात सुरू*
*‘गोवा बियॉन्ड बीचेस’ संकल्पनेतून जंगले, वन्यजीव व पारंपरिक ज्ञानाचा गौरव*
पणजी
पहिला वन जैवविविधता महोत्सव आज पणजी येथील आर्ट पार्कमध्ये सुरू झाला. गोवा वन विकास महामंडळाने आयोजित केलेला हा महोत्सव, ‘गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील ओळख’ (गोवा बियॉन्ड बीचेस) सादर करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्पित करण्यात आला आहे, ज्यात जंगले, वन्यजीव, पारंपरिक ज्ञान आणि समुदायाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाश्वत पद्धतींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
*ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब उमटवणारा महोत्सव:-*
या महोत्सवात असे अनुभव-आधारित दालन आहेत, जे सजीव परंपरा आणि शाश्वत पद्धती अधोरेखित करतात. अभ्यागत ‘आंगण अनुभव’ (Angon Experience) पाहू शकतात, जिथे चणेकार, खाजेकार, नारळाच्या वस्तू बनवणारे कारागीर, मातीची भांडी बनवणारे कुंभार, माळी आणि कोकेडामा कलाकार यांच्याद्वारे पारंपरिक कौशल्यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. ‘ग्रीन बाजार’मध्ये पर्यावरणपूरक उत्पादने आणि वनांवर आधारित उपजीविका सादर केल्या जातात, तर ‘फॉरेस्ट किचन’मध्ये समुदाय आणि बचत गटांनी तयार केलेले जंगले आणि ऋतू यांच्यातील घनिष्ठ संबंध दर्शवणारे आदिवासी आणि पारंपरिक पदार्थ चाखायला मिळणार आहेत.
*सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल:-*
या महोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या सत्रात सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमात चैतन्य आणले आणि कला व कथाकथनाच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्वाचे संदेश दिले. ‘म्हाका नाका प्लास्टिक’ (मला प्लास्टिक नको), धालो, फुगडी आणि मोरुल्यो यांसारखे लोकनृत्य, फ्युजन संगीत आणि दिव्यांग व्यक्तींनी सादर केलेला ‘गॉफ नृत्य’ यांसारख्या सादरीकरणांनी संवर्धन आणि सर्वसमावेशकतेवर भर दिला. या कार्यक्रमादरम्यान, आसावरी कुलकर्णी लिखित ‘फॉरेस्ट रेसिपीज ऑफ गोवा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले, ज्यात वन उत्पादने आणि स्थानिक ज्ञानाशी संबंधित पारंपरिक पाककृतींचे दस्तऐवजीकरण केले आहे.
*निसर्ग संरक्षणात Gen Z ची महत्त्वाची भूमिका:- मुख्यमंत्री*
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “हा महोत्सव जंगले, वन्यजीव आणि पारंपरिक ज्ञानाकडे लक्ष वेधून ‘गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील ओळख’ या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.” ते पुढे म्हणाले, “निसर्ग आणि वारशाच्या संरक्षणात ‘जनरेशन झेड’ची (Gen Z) महत्त्वाची भूमिका आहे आणि अशा प्रकारचे मंच तरुणांमध्ये जबाबदार सवयी रुजवण्यास मदत करतात.” त्यांनी शाश्वत उपजीविकेला पाठिंबा देताना जंगले आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री विश्वजित राणे, रोहन खंवटे, सदानंद तानावडे, देविया राणे आणि प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते.
