सावंतवाडीत अभिनव हळदीकुंकू; ‘एक तरी झाड लावा’ संकल्पनेतून तुळशीचे रोप वाटप
सावंतवाडी :
“सावंतवाडीतील महिलांचे जीवन सुखी, सुरक्षित आणि समृद्ध व्हावे, हीच आमची खरी प्रतिज्ञा आहे. महिलांना कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी निःसंकोच नगरपरिषदेत यावे; त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत,” असे ठाम प्रतिपादन सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी केले.
उभा बाजार येथील जि. प. शाळा क्रमांक २ मधील अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने आयोजित अभिनव हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावर्षीचा हळदीकुंकू सोहळा ‘एक तरी झाड लावा’ या सामाजिक संदेशातून साजरा करण्यात आला. नगराध्यक्षा भोसले म्हणाल्या, “तुळस ही केवळ धार्मिकच नव्हे, तर आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक आहे. तुळशीमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. भविष्यात ऑक्सिजनसाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रत्येक घरात तुळशीचे रोप असणे गरजेचे आहे.”
अंगणवाडी क्रमांक १५ च्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून हळदीकुंकवाचे वाण म्हणून प्लास्टिक किंवा वस्तू न देता तुळशीचे रोप दिले जाते. या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना नगराध्यक्षा म्हणाल्या की, “घरातील स्त्री आणि तुळशी वृंदावन हे समृद्धीचे प्रतीक आहे. या रोपांमुळे घरात आरोग्य, सकारात्मकता आणि मांगल्य नांदते.”
कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. अंगणवाडी सेविका अनुराधा पवार यांच्या हस्ते नगराध्यक्षांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका दुलारी रांगणेकर व मोहिनी मडगावकर यांचाही सन्मान करण्यात आला. नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या सत्काराचा स्वीकार त्यांच्या पत्नी श्रेया आडीवरेकर यांनी स्वीकारला.
कार्यक्रमात अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर, सरिता भिसे, पालक व शिक्षक मीना दाभोलकर, नेहा काष्टे, ज्योती कदम, स्वानंदी नेवगी, जानवी गावडे तसेच अंगणवाडीतील चिमुकले बालक शुभांगी मेस्त्री, गीतांश मुंज, सहावी नेवगी, अथांग मातोंडकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा काष्टे यांनी केले, तर ज्योती कदम यांनी तुळशी वृंदावनाचे महत्त्व विशद केले. अंगणवाडीतील बालकांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी नगराध्यक्षांसोबत सेल्फी घेत आनंद व्यक्त केला.
