आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात तरुण नेतृत्वाची चर्चा; सुदन कवठणकर यांचे नाव केंद्रस्थानी
शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या संघटनात्मक कामामुळे उमेदवारीची जोरदार मागणी
सावंतवाडी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या मतदारसंघात शिवसेनेकडून नव्या आणि कार्यक्षम नेतृत्वाचा शोध सुरू असताना सामाजिक कार्यकर्ता सुदन कवठणकर यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आले आहे. पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका, व्यापक जनसंपर्क आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ही त्यांची ओळख ठरत आहे.
कवठणी गावातून सामाजिक कार्याला सुरुवात करून त्यांनी सातार्डा, सातोसे, मडुरा व आरोंदा परिसरातील विविध गावांतील प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला असून, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. यामुळे मतदारसंघातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे. कवठणी गावात सरपंचपदाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, नियोजनबद्ध विकासाची त्यांची दृष्टी अनेकांना भावली आहे. हा अनुभव संपूर्ण आरोंदा मतदारसंघाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केवळ पक्षांतर्गतच नव्हे तर विरोधी गटातूनही होत आहे. विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वाला संधी मिळावी, अशी भावना मतदारसंघात उमटत असल्याने येत्या निवडणुकीत सुदन कवठणकर यांची भूमिका निर्णायक ठरेल, असे चित्र सध्या दिसत आहे.
