सिंधुदुर्ग सारख्या साक्षर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात पोटचा मुलगा मालमत्तेच्या हव्यासापोटी आणि दारूच्या व्यसनापाई आपल्या जन्मदात्या आईचा बंदुकीची गोळी झाडून निर्गुण खून करतो आणि एवढे करून देखील त्याला या गुन्ह्याचा जराही पश्चात्ताप होत नाही उलट ‘एक संपवला अजून एक शिल्लक आहे’ असा क्रूर आणि भयंकर गर्भित इशारा देणारे शब्द त्याच्या तोंडून येतात ही घटना खरोखरच मनाला सुन्न करणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. वर्तमानपत्रामधील ही बातमी केवळ एका गुन्ह्याची नोंद नसून ती आपल्या कोसळत असलेल्या सामाजिक मानसिकतेचा आरसा आहे.
*समाजाला आत्मचिंतनाची गरज!*
ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवले, जिने बोट धरून चालायला शिकवले, तिचाच अंत रक्ताच्या नात्याकडून व्हावा, यापेक्षा दुर्दैवी दुसरे काय असू शकते? ही घटना म्हणजे केवळ कौटुंबिक वाद नसून आपल्या समाजाला लागलेली एक खोलवरची ‘कर्करोगाची’ गाठ आहे. आणि हि गाठ मागील दोन तीन घटनांचा विचार केल्यास आपल्या सिंधुदुर्गात देखील बळावत चाललेली आहे. याचा आपण सर्वांनी मिळून वेळीच प्रतिकार केला नाही तर ज्या आईच्या कुशीत आपण जन्माला आलो तिच्याशी आपण कायमचा द्रोह केल्यासारखं होणार आहे.
आजचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी जात आहे. दारू, अमली पदार्थ आणि झटपट श्रीमंत होण्याच्या नादात माणसाला ‘माणूस’ म्हणून ओळखण्याची शक्ती तो गमावून बसला आहे. व्यसन केवळ शरीराचा नाश करत नाही, तर ते बुद्धी आणि भावनांनाही मारून टाकते. नशेत असताना विवेकबुद्धी नष्ट होते आणि मग समोर आपली आई आहे की शत्रू, याचे देखील भान उरत नाही. व्यसनाधीनतेचा विळखा आणि सुन्न झालेली संवेदनाच याला जबाबदार आहे.
*संस्कारांची खालावलेली पातळी*
“संस्कार” हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया होता. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांचा आदर आणि नीतिमत्तेचे धडे आपोआप मिळत असत. आज विभक्त कुटुंब पद्धती आणि धावपळीच्या युगात पालकांचा पाल्यांशी संवाद तुटला आहे. संस्कारांची जागा केवळ भौतिक सुखांनी आणि स्पर्धेने घेतली आहे. जेव्हा घरातून आणि शाळेतून मूल्यांचे शिक्षण कमी होते, तेव्हा अशा हिंसक प्रवृत्ती डोके वर काढतात.
*आध्यात्मिकतेपासून दुरावलेला तरुण वर्ग*
आध्यात्मिकता म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर तो स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याचा मार्ग आहे. आजचा तरुण वर्ग विज्ञानाच्या नावाखाली किंवा आधुनिकतेच्या ओघात आध्यात्मिक विचारांपासून दूर गेला आहे. संयम, क्षमा, शांती आणि कृतज्ञता हे गुण आध्यात्मिक जोड असल्याशिवाय रुजत नाहीत. अंतर्मन रिकामे असल्याने त्या जागी क्रोध, लोभ आणि मत्सर यांसारखे विकार घर करत आहेत.
*मालमत्तेचा हव्यास आणि नात्यांचा बाजार!*
आजच्या युगात नात्यांपेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले जात आहे. “आई-वडील म्हणजे केवळ मालमत्तेचे स्रोत” अशी घातक विचारसरणी रुजत चालली आहे. चंगळवादामुळे मानवी संवेदना बोथट झाल्या असून, सुखाच्या शोधात असलेला तरुण रक्ताच्या नात्यांचा बळी द्यायलाही मागे-पुढे पाहत नाही.
या हृदयद्रावक घटनेची केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तर समाजाच्या या मानसिक आजारावर गांभीर्याने उपाय करणे गरजेचे आहे. शालेय स्तरापासूनच नैतिक शिक्षण आणि ‘मानवता’ हा विषय सक्तीचा करण्याची गरज आता खऱ्या अर्थाने निर्माण झालीय. व्यसनात अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर त्यांच्यासाठी व्यापक समुपदेशन मोहिमा राबवणे आवश्यक आहे.पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद वाढविण्याची गरज आता प्रकर्षाने निर्माण झाली आहे त्यांना केवळ पैसे न देता, भौतिक सुखाच्या वस्तू न देता वेळ आणि संस्कार देण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे हि काळाची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. .तरुणांना योगाभ्यास, ध्यान आणि चांगल्या साहित्याची गोडी लावून त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा लागणार आहे.
अशा गुन्ह्यांमध्ये केवळ अटक होईल, कदाचित जलद गतीने कठोर शिक्षा होऊन समाजात काही काळापुरती दहशत देखील निर्माण होईल आणि आपण तशी अपेक्षा देखील ठेवणे क्रमप्राप्त आहेच, पण केवळ *“शिक्षा”* हा त्यावरचा दूरगामी उपाय होऊ शकत नाही. याउलट अजूनही वेळ गेलेली नाही. जर आपण अजूनही सावध झालो नाही, तर भविष्यात अशा घटनांचे सत्र थांबवणे कठीण होईल. समाजाचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी संस्कार, व्यसनमुक्ती आणि अध्यात्म या त्रिसूत्रीचा वापर करणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे यात शंका नाही.
*श्री. विक्रम सुधाकर जांभेकर* ,*
मु. पो. पोंभुर्ले देऊळवाडी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाजवळ,
ता. देवगड जि. सिंधुदुर्ग.
मो. ९०२८८०९३६४
