You are currently viewing वेंगुर्ल्यात धक्कादायक घटना 

वेंगुर्ल्यात धक्कादायक घटना 

वेंगुर्ल्यात धक्कादायक घटना

कर्जाच्या वादातून मुलाकडून जन्मदात्या आईची गोळी झाडून हत्या

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कर्जाच्या वादातून मुलानेच आपल्या जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना काल रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर याने घराच्या छपरावर चढून बंदुकीने त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी त्यांच्या डाव्या बाजूच्या छातीला लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या प्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार उमेश सरमळकर याच्याविरुद्ध बीएनएस कलम १०३(३) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५, २७, २९ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. या कर्जावरून आई आणि मुलामध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करीत आहेत.
या घटनेमुळे अणसुर परिसरात शोककळा पसरली असून आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा