शिंदे गटाचे अजय गोंदावळे पराभूत; १२–७ मतांनी भाजपचा ठसा ठळक
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय ॲड. अनिल निरवडेकर यांनी निर्णायक विजय मिळवत उपनगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले. त्यांनी शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार अजय गोंदावळे यांचा पराभव केला. या निकालामुळे सावंतवाडी नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ही निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उतरवल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.
मतदानात ॲड. अनिल निरवडेकर यांना १२ मते मिळाली, तर अजय गोंदावळे यांना ७ मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला.
निकाल जाहीर होताच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. शहराच्या विकासकामांना गती देणे आणि नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे, हीच आपली दिशा असेल, अशी ग्वाही नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांनी यावेळी दिली.
