सावंतवाडी उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक
भाजपच्या तीन नावांची चर्चा : स्वीकृत नगरसेवकांचीही होणार निवड
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी उद्या बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी युतीची शक्यता वर्तवली जात होती, परंतु जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्ला नगरपरिषदेत युती फिस्कटल्याने सावंतवाडीतही त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. युती न झाल्यास भाजपकडून ॲड. अनिल निरवडेकर, आनंद नेवगी व सुधीर आडिवरेकर यांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी नगरपालिकेत भाजपने निर्विवाद यश मिळवले असून सध्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला संधी देऊन युती करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू होता. मात्र, जिल्ह्यातील इतर ठिकाणची राजकीय परिस्थिती पाहता सावंतवाडीत युती होणार नसल्याचे बोलले जात आहे. सावंतवाडीत भाजपकडे ११ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत आहे, तर शिवसेनेचे ७, उबाठा शिवसेना १ आणि काँग्रेसचा १ असे बलाबल आहे.
भाजप आपलाच उपनगराध्यक्ष बसवण्यावर ठाम राहिल्यास भाजपा शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, ॲड. अनिल निरवडेकर व आनंद नेवगी यांची नावे स्पर्धेत आहेत. जर ऐनवेळी युती झालीच तर शिवसेनेचे संजू परब किंवा बाबू कुडतरकर यांना संधी मिळू शकते. या संदर्भातील अंतिम निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल. युती न झाल्यास शिवसेना विरोधी बाकावर बसण्याची शक्यता आहे.
स्वीकृत नगरसेवकपदी सिद्धार्थ भांबुरे आणि निता सावंत-कविटकर
स्वीकृत नगरसेवक पदासाठी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एक नाव निश्चित केले आहे. भाजपकडून ॲड. सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेनेकडून ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. गटनेत्यांनी त्यांचे अर्ज जिल्हा नगरविकास अधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे सादर केले आहेत.
