जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
आचारसंहिता लागू
सिंधुदुर्ग :
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा संपली असून राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १२ जिल्हा परिषदांबरोबरच १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या घोषणेसोबतच संपूर्ण राज्यात निवडणूक आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची अद्ययावत मतदार यादी अंतिम मानण्यात येणार आहे.
या निवडणुकीत मतदारांना दोन स्वतंत्र मते नोंदवावी लागणार आहेत. एक मत जिल्हा परिषद सदस्यासाठी तर दुसरे मत पंचायत समिती सदस्यासाठी असेल. या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे.
कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या निवडणुका एकाच वेळी होत असल्याने राज्याचे लक्ष या भागाकडे केंद्रित झाले आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, निवडणूक जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शासकीय योजनांच्या जाहिराती व बॅनर काढून टाकण्याची कारवाई सुरू असून, निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या नियुक्त्याही पूर्ण करण्यात आल्या आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने मतदारांना केले आहे.
