You are currently viewing आम्ही सिद्ध लेखिका या अखिल भारतीय साहित्य संस्थेचे सलग चौथे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन

आम्ही सिद्ध लेखिका या अखिल भारतीय साहित्य संस्थेचे सलग चौथे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन

सांगली :

आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सलग चौथे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन दि.३१जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी सांगली जिल्हा कार्यकारिणीतर्फे *पटवर्धन सभागृह, स्टेशन रोड, मिरज*, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या उद्घाटक वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरच्या संचालिका तसेच बाल न्याय मंडळ सदस्य न्यायाधीश जयश्री श्रेणिक पाटील असून संस्थेच्या जेष्ठ विश्वस्त मा. उषाताई चांदुरकर या स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध लेखिका, अनुवादिका, संपादिका आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या सोनाली नवांगुळ भूषवणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. छाया महाजन तसेच भूमि मगदूम या तरुण उद्योजिका उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष प्रा.पद्मा हुशिंग तसेच पश्चिम विभाग प्रमुख मनीषा रायजादे पाटील यांनी दिली.

या संमेलनात भव्य ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, प्रकाशन सत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, परिसंवाद अशा साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तसेच लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक, समीक्षक, लेखिका मा. तारा भवाळकर यांची मुलाखत हे मुख्य आकर्षण आहे

संमेलनाकरिता संस्थेच्या विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी, विभाग प्रमुख, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख तसेच गोवा, गुजरात, मध्य प्रदेश येथील मान्यवर लेखिका, संस्थेच्या सर्व कार्यकारिणी सदस्य आणि रसिक अशा एकूण २५० ते ३०० लेखिका उपस्थित राहून संमेलनाचा आस्वाद घेणार आहेत.

या संमेलनाचे औचित्य साधून घेतलेल्या कविता, गझल व कथालेखन स्पर्धेच्या विजेत्यांचा या प्रसंगी सत्कार केला जाणार आहे.

स्व. मोहन कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या आम्ही सिद्ध लेखिका या मान्यताप्राप्त संस्थेचे ‘लिहा आणि लिहिते व्हा’ हे ब्रीदवाक्य असून अनेक मान्यवर साहित्यिका, लेखिका आणि नवोदित लेखिकांसाठी ही संस्था, स्त्रियांना व्यक्त होण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. गेल्या सहा वर्षात संस्थेच्या सदस्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सलग चौथ्या वर्षी  महिलांनी महिलांसाठीचे हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे.

 

प्रा.मानसी जोशी

सहसचिव

आम्ही सिध्द लेखिका

प्रतिक्रिया व्यक्त करा