You are currently viewing एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘युवक सप्ताह’ व खादी मार्च

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘युवक सप्ताह’ व खादी मार्च

*एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘युवक सप्ताह’ व खादी मार्च*

*राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजन; विद्यार्थ्यांचा मिळाला उदंड प्रतिसाद*

पुणे :

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे राष्ट्रीय युवा दिन २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘युवक सप्ताह २०२६’ अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सहभागी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांचे आयोजन स्वामी विवेकानंद चेअर अंतर्गत करण्यात आले. २०२२ साली स्थापन झालेली ही चेअर माईर्स एमआयटी समूहाचे संस्थापक, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलपती व अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वादाने कार्यरत असून, कार्यकारी अध्यक्ष व प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. या उपक्रमात समग्र विकास शाळा (एसएचडी), अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष (आयक्यूएसी) तसेच स्कुल ऑफ वैदिक विज्ञान यांचा संयुक्त सहभाग होता.

युवक सप्ताहाच्या निमित्ताने निबंध लेखन, चित्रकला, पारंपरिक वेशभूषा आणि ऑनलाइन प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, बौद्धिक जागरूकता व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.

या सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरलेला खादी मार्च युवा दिनानिमित्ताने मॅनेट इमारतीपासून एसएफटी इमारतीपर्यंत काढण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या साधेपणा, स्वावलंबन व राष्ट्राभिमान या मूल्यांचे प्रतीक म्हणून या मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व विद्यापीठातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मार्चच्या सुरुवातीला कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर, विविध विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अतुल पाटील यांनी या उपक्रमांचे संयोजन केले. युवक सप्ताह २०२६ च्या यशस्वी आयोजनातून समाजाभिमुख, मूल्याधिष्ठित व बौद्धिकदृष्ट्या सक्षम युवा पिढी घडविण्याच्या निश्चय एमआयटी एडीटी विद्यापीठात करण्यात आला. या सप्ताहभर चाललेल्या उपक्रमांद्वारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवून, ते प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा