नगरसेवक देव्या सुर्याजी यांची तत्पर भूमिका; नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच काम करण्याच्या सक्त सूचना
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरात एम.एन.जी.एल.च्या माध्यमातून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र जुनाबाजार होळीचा खुंट परिसरात हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याची बाब येथील नागरिकांनी नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित काम रोखले.
या प्रकाराची माहिती मिळताच युवराज लखमराजे भोंसले यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला व यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. ही बाब नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या कानावर घालण्यात आली. त्यांनी गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
जुनाबाजार होळीचा खुंट येथे गॅस पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले असून श्री. नाईक यांच्या घरासमोर बीएसएनएलचे १४ पाईप भूमिगत आहेत. नियमानुसार गॅस पाईपलाईन किमान एक मीटर खोल असणे आवश्यक असताना, ती थेट बीएसएनएलच्या पाईपवरून टाकण्यात येत होती. तसेच रस्त्याच्या अवघ्या एक फूट खाली लाईन टाकली जात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत होता. त्यामुळेच हे काम रोखल्याचे मत नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले.
संबंधित कंपनीने काम करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी व नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच काम पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले शहरातील इतर कामांची पाहणी करत असल्याने युवराज लखमराजे भोंसले यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना बोलावून योग्य तो मार्ग काढला. तसेच नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी नगरपरिषद अधिकाऱ्यांना जातीने उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवण्याच्या व गॅस पाईपलाईनच्या कामात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, अशा सक्त सूचना दिल्या.
यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, बीएसएनएलचे अधिकारी, एम.एन.जी.एल.चे कर्मचारी तसेच येथील रहिवासी देवेंद्र नाईक, गिरीश नाईक आदी उपस्थित होते.
