मुंबई :
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मलबार हिल येथील ‘सुवर्णगड’ या शासकीय निवासस्थानाबाहेर आज सकाळी एक अज्ञात संशयास्पद बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे बेवारस वस्तू सापडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आज सकाळी ‘सुवर्णगड’ बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकांना एक बेवारस बॅग पडलेली दिसली. बराच वेळ उलटूनही ती बॅग नेण्यासाठी कोणीही न आल्याने सुरक्षा रक्षकांचा संशय बळावला. परिसरात शोध घेऊनही बॅगचा मालक न सापडल्याने तात्काळ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंगल्याचा संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून सील केला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली असून नागरिकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर रिकामी करून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले आहे. बॅगमध्ये नेमके काय आहे, याची तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ही बॅग तिथे कोणी ठेवली आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिस तपासत आहेत. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी फुटेज तपासण्याचे काम सुरू झाले आहे.
मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे वस्तू सापडल्याने सुरक्षेत मोठी त्रुटी राहिली आहे का, याबाबत राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे मलबार हिल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, पोलिस प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
