मालवणमध्ये श्री देव रामेश्वर व किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू
मालवण
मालवण शहरात होणाऱ्या श्री देव रामेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी मेढा येथील जोशी वाडा परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून जागेचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येणार असल्याने परिसराची दुरवस्था दूर करणे गरजेचे होते.
दरम्यान, भाविकांची गर्दी लक्षात घेता परिसरातील नाला साफ करणे, तसेच रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी एलईडी दिवे बसवावेत, अशी मागणी मालवण नगरपालिकेकडे करण्यात आली आहे. प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
श्री देव रामेश्वराच्या पालखी सोहळ्यासाठी मेढावासी पूर्णपणे सज्ज झाले असून, हा सोहळा भक्तिमय आणि उत्साहात पार पडावा यासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
