आंगणेवाडी – कुणकेश्वर जत्रोत्सवाचे काटेकोर नियोजन
भाविकांच्या सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य
– पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी श्री. भराडी देवी आणि कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
आंगणेवाडी श्री. भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव दि. 9 फेब्रुवारी 2026, तर कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाचा जत्रोत्सव महाशिवरात्री, दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. या दोन्ही जत्रोत्सवांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, आंगणेवाडी व कुणकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, हे दोन्ही जत्रोत्सव जिल्ह्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कर्मचारी नेमावेत.
यात्राकाळात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याचे निर्देश देताना त्यांनी सांगितले की, भाविकांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त वैद्यकीय पथके, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यक औषधसाठा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त डॉक्टर व बेडची व्यवस्था करण्यात यावी.
स्वच्छतेबाबत विशेष भर देत पालकमंत्री म्हणाले की, यात्रेच्या कालावधीत तसेच यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य आणि वेळेत विल्हेवाट लावावी. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पुरेशा प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. महावितरण (एमएसईबी) यांनी वीजपुरवठ्याबाबत अधिक दक्षता घ्यावी.
मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जेणेकरून सुरक्षिततेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल. एका ठिकाणी अतिगर्दी होऊ नये म्हणून दुकानांना ठराविक अंतर राखून परवानगी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
भाविकांच्या सोयीसाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नियोजन, शिस्त आणि सेवाभावाच्या माध्यमातून हे जत्रोत्सव सुरक्षित, सुव्यवस्थित आणि यशस्वीरीत्या पार पडावेत असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
