भाविकांना जत्रोत्सवात सुलभ दर्शन होण्यासाठी नियोजन!
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आंगणेवाडी जत्रा तयारीचा आढावा!
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शुक्रवारी सकाळी आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेऊन भराडी मातेचे आशीर्वाद घेतले. 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भराडी मातेच्या प्रसिद्ध अशा जत्रोत्सवासंदर्भात आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्याकडून जत्रा उत्सव नियोजन माहिती करून घेतली. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी शुक्रवारी सकाळी मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील प्रसिद्ध अशा श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिरास भेट देऊन भराडी माते चरणी लीन झाल्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे म्हणाल्या, महाराष्ट्रामधील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी जत्रा उत्सवाला अवघा एक महिना राहिला असून या जत्रोत्सवाला प्रशासनाच्या वतीने जे सहकार्य लागेल ते सर्व देण्यात येईल. या जत्रोत्सवात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहता कामा नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि भाविकांना जत्रोत्सवात सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात येईल. आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केलेल्या सत्काराबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी महत्त्वाच्या अशा भाविकांच्या दर्शन रांगा तसेच सीसीटीव्ही, ओव्हर ब्रिज दर्शन रांगा, व्हीआयपी रांगा, मंदिर परिसरातील सुरक्षितता, व्हीआयपी रस्ता अशा महत्त्वाच्या जागांची पाहणी करून यासंदर्भात माहिती करून घेतली तसेच अत्यावश्यक सूचना यावेळी संबंधित उपस्थित अधिकारी वर्ग आणि आंगणे कुटुंबीय यांना दिल्या. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे या प्रथमच आंगणेवाडी येथे आई भराडी मातेच्या दर्शनासाठी आल्यामुळे आंगणे कुटुंबीयांच्या वतीने श्री काका आंगणे, भास्कर आंगणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कोळंब मंडळ अधिकारी मीनल चव्हाण प्रशासकीय अधिकारी एस. डी. चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी युगल प्रभूगावकर, तलाठी लखमोड, पोलीस पाटील पंकज आंगणे, अर्जुन आंगणे, बाबू आंगणे, माजी अध्यक्ष भास्कर आंगणे, भरत आंगणे, सतीश आंगणे, समीर आंगणे, गणेश आंगणे, दिनेश आंगणे, विकास आंगणे, रुपेश आंगणे, नंदू आंगणे, गौरेश अंगणे, सत्यविजय आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे तहसीलदार गणेश लवे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा आंगणे कुटुंबीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने काका आंगणे, बाबू आंगणे, भास्कर आंगणे, भरत आंगणे यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला आंगणेवाडी जत्रा उत्सवाचे आगामी नियोजन याची माहिती दिली. आंगणेवाडी यात्रा संवाद भेडसावणारा मोबाईल रेंज प्रश्न संदर्भातही जिओचा टॉवर मिळण्याबाबत तसेच पाणी प्रश्नाबाबतही जिल्हाधिकारी यांचे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनीही ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा विनिमय केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनीही जिल्हाधिकारी यांना जत्रा उत्सवाची माहिती दिली. यावेळी सूत्रसंचालन आभार बाबू आंगणे यांनी मानले.


