You are currently viewing मालवण शहर स्वच्छतेच्या दिशेने निर्णायक पावले
Oplus_16908288

मालवण शहर स्वच्छतेच्या दिशेने निर्णायक पावले

आ. निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम

“फुकाचे श्रेय लाटू नका, शहर स्वच्छ ठेवा” – नगरसेविका मेघा गावकर यांचा स्पष्ट इशारा

मालवण :

शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शिवसेना लोकप्रतिनिधींच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून, आता कचरा व्यवस्थापनाबाबत कडक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती नगरसेविका मेघा गावकर यांनी दिली आहे.

आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेत मालवणच्या स्वच्छतेसाठी ४० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फळी उपलब्ध करून दिली आहे. हे कर्मचारी पूर्ण क्षमतेने शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता करत असून, त्यामुळे शहराचे रूप पालटताना दिसत आहे.

२१ तारखेला नगरपरिषदेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नव-निवडीत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी तातडीने मार्केट परिसराची पाहणी केली. व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कचरा गाडीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही गाडी आता दररोज नियमितपणे कचरा संकलन करत असून, नागरिकांना याबाबत पूर्वसूचनाही देण्यात आली आहे.

शहरात स्वच्छता मोहीम जोरात सुरू असतानाच काही विघ्नसंतोषी लोक हेतुपुरस्सर कचरा गाडी गेल्यानंतर रस्त्यावर कचरा फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळा निर्माण होत असून शहराचे विद्रूपीकरण होत आहे. अशा व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रशासन आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.

कोणीही या कामाचे फुकाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शहर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. जे लोक मुद्दाम कचरा फेकत आहेत, त्यांच्यावर प्रशासन सख्त कारवाई करणार असून दंड आकारला जाणार आहे, असे नगरसेविका मेघा गावकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेना पक्षाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणी कचरा गाडी गेल्यानंतर उघड्यावर कचरा फेकताना आढळल्यास त्या व्यक्तीचे किंवा त्यांच्या गाडीचे फोटो काढून प्रशासनाकडे पाठवावेत. दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा