You are currently viewing २४ जानेवारीला बालहर्षाचा उत्सव कणकवलीत
Oplus_16908288

२४ जानेवारीला बालहर्षाचा उत्सव कणकवलीत

‘खाऊ गल्ली’तून लहानग्यांसाठी आनंदाची मेजवानी

समीर नलावडे मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम, पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली :

लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ‘खाऊ गल्ली’ हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे हा कार्यक्रम होणार असून, यामध्ये एक हजार लहान मुलांना प्रत्येकी ५० रुपयांचे कूपन देण्यात येणार आहेत.

या ‘खाऊ गल्ली’ उपक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनप्रसंगी लहान मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात येणार असून, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांसाठी हा दिवस खास आनंदाचा ठरणार आहे.

कार्यक्रमस्थळी स्थानिक नागरिकांना फूड स्टॉल्स लावण्यासाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.

लहान मुलांच्या मनोरंजनासाठी फनी गेम्स, जादूगारांचे प्रयोग, टॅटू काढण्यासाठी गोव्यातील दोन कलाकार, तसेच दोन आकर्षक सेल्फी पॉईंट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांसोबत आलेल्या पालकांसाठी मराठी व हिंदी गाण्यांचा धमाकेदार ऑर्केस्ट्रा देखील कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे, अशी माहिती कणकवलीतील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष अण्णा कोटे, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमणे, जावेद शेख, बाळा सावंत, राज नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

समीर नलावडे यांनी सांगितले की, कणकवलीतील नागरिकांनी माझ्या राजकीय जीवनात नेहमीच मला पाठबळ दिले आहे. नगरपंचायत निवडणुकीत मला ५ हजार ९६ मते मिळाली, तर माझ्या पत्नीला सर्वाधिक मताधिक्यांनी विजय मिळाला. मतदान न करणारेही माझेच मानणारे असल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यामुळे पदावर नसलो तरी कणकवलीकरांशी माझी बांधिलकी कायम राहील. पालक व मुलांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच यंदाही ‘खाऊ गल्ली’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यक्रमाला कणकवली शहरातील पालक व लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, खा. नारायण राणे हाच माझा पक्ष असून, त्यांना व मंत्री नितेश राणे यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, अशी ठाम भूमिका समीर नलावडे यांनी यावेळी मांडली. स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा