*आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट २३ जानेवारीपासून*
• *एमआयटी एडीटी विद्यापीठात रंगणार राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्पर्धेचा थरार*
• *ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे भव्य उद्घाटन*
पुणे :
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम २३ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार व ऑलिंपिक कांस्यपदक विजेते मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड तसेच डॉ. सुनीता कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात होणार आहे. या समारंभात पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमध्ये आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम) यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असून, ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने देशातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी तसेच विविध क्रीडाप्रकारांतून प्रतिभावान खेळाडू घडावेत, या उद्देशाने विश्वनाथ स्पोर्ट मिटची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून सक्षम क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देत राज्यासह देशाच्या क्रीडा संस्कृतीत मोलाची भर घालणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हाॅलिबाॅल, कबड्डी, टेनिस, टेबल-टेनिस, खो-खो, वाॅटर पोलो, चेस, जलतरण, इनडोअर रोईंग, बाॅक्सिंग, तिरंदाजी या खेळांमध्ये सहभागी क्रीडापटूंमध्ये विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथील १५०+ एकरांच्या प्रशस्त व अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी सुसज्ज कॅम्पसमध्ये ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रीदवाक्यासह आयोजित व्हीएसएम–८ मध्ये आतापर्यंत १३५ हून अधिक शैक्षणिक संस्था/विद्यापीठांमधील ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी १५ क्रीडा प्रकारांसाठी नावनोंदणी केली आहे. स्पर्धेच्या कालावधीत पाच दिवसांत १० हजारांहून अधिक खेळाडू व प्रशिक्षकांचा विद्यापीठ परिसरात वावर राहणार आहे.
सदर स्पर्धेसाठी अद्यापही नावनोंदणी सुरू असून, राज्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घेऊन विद्यापीठाच्या सुसज्ज क्रीडा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे तसेच क्रीडा संचालक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. पद्माकर फड यांनी केले आहे.
यंदा विश्वनाथ स्पोर्ट मिटच्या आठव्या हंगामात १५ क्रीडा प्रकारांमध्ये १३५ हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५ हजारांहून अधिक खेळाडू आपली प्रतिभा सादर करणार आहेत. डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीतील विद्यार्थी व शिक्षकांनी स्पर्धेच्या तयारीत पुढाकार घेतल्याने या सहा दिवसांत विद्यापीठाचे संपूर्ण वातावरण क्रीडामय होणार आहे.
*— प्रा. डॉ. मंगेश कराड,*
कार्यकारी अध्यक्ष व प्र-कुलपती,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
