You are currently viewing ज्ञान,अनुभव आणि आनंदाचा त्रिवेणी संगम

ज्ञान,अनुभव आणि आनंदाचा त्रिवेणी संगम

*ज्ञान,अनुभव आणि आनंदाचा त्रिवेणी संगम*

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांचा गोवा शैक्षणिक अभ्यासदौरा

बांदा

विद्यार्थ्यांचे ज्ञान केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून समृद्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांचा गोवा राज्यात शैक्षणिक अभ्यासदौरा नुकताच उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, इतिहास, भूगोल तसेच सामाजिक जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडले.
या अभ्यासदौऱ्यात विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने गोवा विज्ञान केंद्र येथे भेट दिली. विज्ञान केंद्रातील विविध वैज्ञानिक उपकरणे, प्रयोगात्मक प्रतिकृती, गती-ऊर्जा, गुरुत्वाकर्षण, प्रकाश, ध्वनी, विद्युत तसेच मानवी शरीराशी संबंधित माहितीपूर्ण दालनांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्यक्ष प्रयोग पाहताना व स्वतः प्रयोग करून पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता व आनंद दिसून येत होता. विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील विषय नसून तो दैनंदिन जीवनाशी कसा जोडलेला आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या भेटीतून झाली.
तसेच या अभ्यासदौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी गोव्यातील विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटनस्थळांनाही भेटी दिल्या. पोर्तुगीज काळातील ऐतिहासिक वास्तू, चर्च, किल्ले तसेच समुद्रकिनाऱ्यांचे दर्शन घेताना विद्यार्थ्यांना गोव्याचा समृद्ध इतिहास, संस्कृती व नैसर्गिक सौंदर्य अनुभवता आले. या भेटींमुळे इतिहास व भूगोल विषयांतील घटक अधिक सुस्पष्टपणे समजून घेण्यास मदत झाली.
अभ्यासदौऱ्याच्या संपूर्ण कालावधीत विद्यार्थ्यांनी शिस्त, स्वच्छता, वेळेचे नियोजन व परस्पर सहकार्य यांचे उत्तम उदाहरण सादर केले. समूहात प्रवास करताना एकमेकांची काळजी घेणे, नियमांचे पालन करणे तसेच सामाजिक वर्तनाचे भान राखणे हे गुण विद्यार्थ्यांमध्ये दृढ झाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव वाढीस लागते, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. या अभ्यासदौऱ्यासाठी शाळेचे विद्यार्थी असलेलें जितेंद्र कृष्णा गावडे यांनी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली.तसेच पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार व जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली.
या अभ्यासदौऱ्याचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक जे.डी.पाटील व सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे , स्वयंपाकी मदतनीस संचिता सावंत केले.
अभ्यासदौरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक असून ते ज्ञान, अनुभव व आनंद यांचा सुरेख संगम घडवून आणतात. घारपी शाळेने आयोजित केलेला हा अभ्यासदौरा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव ठरला असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारा ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा