कणकवलीत नेपाळी कामगारावर चाकूहल्ला;
अवघ्या १८ तासांत एलसीबीकडून आरोपी जेरबंद
कणकवली
कणकवली शहरातील चायनीज सेंटर परिसरात नेपाळी कामगारावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग जिल्हा लोकल क्राईम ब्रँचच्या पथकाने अवघ्या १८ तासांत अटक केली आहे. ही कारवाई ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली. सुनील इंदर परिवार (वय २७, मूळ रहिवासी नेपाळ, सध्या कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
६ जानेवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात अज्ञात व्यक्तीने लोकेश बिस्त या नेपाळी कामगाराच्या डोक्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर घटनेचा तपास कणकवली पोलीस आणि सिंधुदुर्ग एलसीबी संयुक्तपणे करत होते. तपासादरम्यान हल्लेखोर हा नेपाळचा नागरिक सुनील परिवार असून तो कणकवली रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे तातडीने कारवाई करत एलसीबी पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि डीवायएसपी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पीएसआय अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व किरण देसाई यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
