*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि.९ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान (PM-USHA) अंतर्गत वाणिज्य आणि व्यवस्थापन : उदयोन्मुख प्रवाह व नवोन्मेष – २०२६” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय परिषदेत वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील बदलते स्वरूप, नव्या संधी, तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवस्थापन पद्धती, डिजिटल अर्थव्यवस्था, ई–कॉमर्स, स्टार्टअप्स व उद्योजकता विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा विश्लेषणाचा व्यवसायावर होणारा परिणाम, शाश्वत विकास तसेच संशोधनातील नव्या दिशा यावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील उदयोन्मुख प्रवाह, नवोन्मेष, संशोधनाच्या नव्या दिशा, शैक्षणिक व व्यावसायिक संधी मिळावी व त्यांना संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने सदर परिषदेचे आयोजन केले आहे. देशभरातील नामवंत अभ्यासक, तज्ज्ञ वक्ते व संशोधक या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेत संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादरीकरणाची संधी मिळणार असून संशोधनाची देवाणघेवाण, शैक्षणिक संवाद आणि सहकार्याची नवी दारे उघडण्यास मदत होणार आहे.
या राष्ट्रीय परिषदेत संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, तसेच वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एम. आय. कुंभार यांनी केले आहे.
