जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरु बालमहोत्सवां’चे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सन २०२५–२६ या वर्षाचा जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’चे दि. ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १, ओरोस बुद्रुक सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी दिली आहे.
महिला व बाल विकास विभागाकडील दि.४ डिसेंबर २०१२ रोजीचे शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र शासनाचे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय स्वयंसेवी संस्था जसे कि बालगृह, निरीक्षणगृह येथील पुनर्वसनासाठी दाखल निराधार, निराश्रित, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना व कलागुणांना वाव देण्यासाठी व जिल्ह्यातील बाल संगोपन योजना अंतर्गत लाभार्थी मुले, मुली व अन्य मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सॉपिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
या बालमहोत्सवामध्ये महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह बालगृह, ओरोस, सिंधुदुर्गनगरी या संस्थेतील प्रवेशित बालके तसेच जिल्ह्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके सहभागी होणार आहेत. तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बालमहोत्सवाचे उद्घाटन दि.७ जानेवारी २०२६ रोजी होणार असून दि.९ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तसेच जिल्हा प्रशासनातील मान्यवर व सन्माननीय अधिकारी बालकांचा उत्साह द्विगुणीत करणे व त्यांना भविष्योपगी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार असून निराधार, निराश्रित, उन्मार्गी तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांचे पाठीवर कौतुकाची थाप मारणे आणि त्यांना त्यांचे सुप्त गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ चे आयोजन करण्यात आले.
