शिरोडा गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या टाकीचे काम अपूर्ण : ग्रामस्थ आक्रमक
पाणीपुरवठा त्वरित सुरू न केल्यास २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा
वेंगुर्ले
शिरोडा गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या टाकीचे काम पूर्ण करून गावात पाणीपुरवठा त्वरित सुरळीत सुरू न केल्यास प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सरपंच मनोज उगवेकर यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शिरोडा सरपंच लतिका रेडकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ही गांधीनगर, केरवाडा, वेळागर व काही अन्य भागात भीषण पाणीटंचाईचा सामना आतापासूनच करावा लागत आहे. गुळदुवे तिरोडा येथील नळपाणी योजनेच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यल्प व अपुरा आहे. या भागातील पिण्याच्या व नियमित वापराच्या पाण्याची गरज पाहता तिलारी प्रकल्पाकडून येणारे पाणी पुरवणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता डोंगरीवाडी, गांधीनगर येथील जलजिवन योजनेच्या अंतर्गत पाण्याची टाकी मागील ३ वर्षा पासून बांधण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराकडून सदरच्या टाकीचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे.
गावातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी वारोंवार मागणी करूनही टाकीचे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांत अत्यंत नाराजी आहे.
याबाबत असलेला जन आक्रोश पाहता २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत वतीने जिल्हा पाणी पुरवठा विभाग व तिलारी पा.पू. योजना विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत येत्या १५ दिवसात टाकीचे उर्वरित काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्या बाबत ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी यांनी आश्वासन दिलेले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे या जलजिवन योजनेच्या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून दिनांक २० जानेवारी २०२६ पर्यंत पाणी पुरवठा सुरू न केला गेल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे दिनांक २६ जानेवारी २०२६ या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय, शिरोडा येथे ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. दरम्यान सरपंच सौ. लतिका रेडकर यांना माजी सरपंच मनोज उगवेकर व दिगंबर परब यांनी निवेदन दिले. या वेळी ग्रामपंचायत अधिकारी पी. आर. इंगळे, ग्रामपंचायत सदस्य श्री मयुरेश शिरोडकर, राजन धानजी, अर्चना नाईक आदी उपस्थित होते.
