You are currently viewing पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीत इतिहासाचा जिवंत अनुभव

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीत इतिहासाचा जिवंत अनुभव

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीत इतिहासाचा जिवंत अनुभव

पुणे (प्रतिनिधी):

पुण्यातील आंबेगाव येथे साकारण्यात आलेली शिवसृष्टी पाहण्याचा योग नुकताच जुळून आला. स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अथक अभ्यासातून आणि शिवभक्तीतून उभारलेली ही शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि लोककल्याणकारी कार्याचा जिवंत इतिहास आहे.

प्रवेशद्वारापासूनच इतिहासाची अनुभूती

तिकीट घेऊन आत प्रवेश करताच भव्य प्रवेशद्वार पाहूनच मन भारावून जाते. महाप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास डोळ्यांसमोर तरळू लागतो. रायतेसाठी महाराजांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही, हे प्रत्येक मांडणीतून ठळकपणे जाणवते.

चार तासांचा अविस्मरणीय प्रवास

संपूर्ण शिवसृष्टी पाहण्यासाठी जवळपास चार तास लागतात; मात्र वेळ कसा जातो हे कळतही नाही. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, सर्व गड-किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती, स्लाईड शो आणि दृश्य मांडणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
गड-किल्ले आणि ऐतिहासिक प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण
सिंधुदुर्ग, पुरंदर, सिंहगड, शिवनेरी, तोरणा, राजगड, रायगड आणि पन्हाळा या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. त्या किल्ल्यांवर झालेली युद्धे, आग्र्याहून महाराजांची सुटका, शाहिस्तेखानाचा पराभव, शिवराज्याभिषेक असे महत्त्वाचे प्रसंग अत्यंत प्रभावी पद्धतीने साकारण्यात आले आहेत.

शस्त्रे, दागिने आणि देवी भवानी मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांची अस्त्रे, तलवारी, बंदुका, वाघनखे, मस्तकावरील शिरस्त्राण, छातीवरील शिलखत तसेच अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन पाहून प्रत्येकजण भारावून जातो. यासोबतच श्री देवी भवानी मंदिराची हुबेहूब प्रतिकृतीही येथे उभारण्यात आली आहे.

4D व 360 अंश चित्रफितीतून शिवचरित्र दर्शन

शिवसृष्टीतील 4D स्क्रीन आणि 360 अंश दृश्यप्रणालीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनप्रवास, त्यांनी सोसलेल्या यातना, गनिमी काव्याने औरंगजेबाला पाजलेली धूळ पाहताना अंगावर काटा उभा राहतो. महाराजांचे हिंदू समाजासाठी असलेले योगदान यावेळी प्रकर्षाने जाणवते.

स्व. बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा मुजरा

आपले संपूर्ण आयुष्य शिवचरित्राच्या अभ्यासासाठी अर्पण करणारे शिवशाहीकार स्व. बाबासाहेब पुरंदरे यांना येथे मानाचा मुजरा करण्यात आला आहे. त्यांनी उभे केलेली ही शिवसृष्टी प्रत्येकाने आवर्जून पाहावी, अशी भावना अनेक अभ्यागत व्यक्त करत आहेत.
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज!
जय भवानी, जय शिवाजी!
— अजित नाडकर्णी, शुभांजित सृष्टी

प्रतिक्रिया व्यक्त करा